सर्वांनी घरीच थांबा ; अनावश्यक फिरणाऱ्या 39 लोकांवर कारवाई दीर्घ काळाच्या खानपानाच्या व्यवस्थेसाठी प्रशासन प्रयत्नरत : जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत समाज माध्यमांना फॉलो करा #CIVID-18 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सर्वांनी घरीच थांबा ; अनावश्यक फिरणाऱ्या 39 लोकांवर कारवाई दीर्घ काळाच्या खानपानाच्या व्यवस्थेसाठी प्रशासन प्रयत्नरत : जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत समाज माध्यमांना फॉलो करा #CIVID-18

Share This


 • हॉटेलचे फक्त किचन, किराणा दुकान सुरू राहतील
 • जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही
 • घरातच राहणे हाच सर्वोत्तम उपाय
 • कॉटन जिनिंग व्यवसाय सुरू राहणार
 • शहराच्या मोठ्या मैदानात भाजीबाजार घेण्याचा विचार
 • शिवभोजन योजना सुरू करणार
 • असाह्य नागरिकांनी मनपाच्या कम्युनिटी किचनचा लाभ घ्यावा
 • लवकरच घरपोच किराणा सुरू करण्याची व्यवस्था
 • जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात मिळतील
 • अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रमुखांनी द्यावे ओळखपत्र


खबरकट्टा /चंद्रपूर, दि. 26 मार्च : 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वानी घरीच रहावे यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.तथापि, 14 एप्रिल व त्यानंतरही गरज पडल्यास दीर्घ काळाच्या खानपान व्यवस्थेसाठी प्रशासन प्रयत्नरत असल्याचे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली अन्नधान्य,इंधनाबाबत साठा व वितरण विषयक बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहिते, सहाय्यक जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एन.बी निंबाळकर तसेच जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनेचे अधिकारी, मेडिकल असोशिएशन, पेट्रोल वितरक, ऑईल व गॅस कंपनीचे प्रतिनिधी, किराणा असोशिएशन, हॉटेलचे मालक,प्रामुख्याने उपस्थित होते.

दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. होम कॉरेन्टाईन करण्यात आलेल्यांची संख्या 54 आहे. 14 दिवस होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्यांची संख्या 51 आहे. नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी 7 नमुने पाठविण्यात आले आहे.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढू नये,यासाठी हॉटेलमधील जेवणावळी पूर्णपणे बंद केल्या आहेत. परंतु, या हॉटेल्समध्ये किचन सुरू राहील. जेवणाची व्यवस्था राहणार नाही. तसेच खानपानाची दुकाने उघडी राहतील मात्र रस्त्यावर उभे राहून किंवा त्या ठिकाणी खान-पान करता येणार नाही. पार्सल सुविधा फक्त उपलब्ध राहतील. आपल्या नजीकच्या किराणा दुकानांमध्ये आपल्या नजीकच्या हॉटेलमध्ये पायी जाऊनच आवश्यकतेनुसार व फारच गरज असल्यास त्याचा वापर करावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. शक्यतो घरातील एखादाच नागरिक अशा कामांसाठी बाहेर पडल्यास उत्तम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेला पुन्हा सुरू करण्यात आले असून यावेळी नागरिकांना शिवभोजन केंद्रात जेवण मिळणार नाही तर महानगर पालिके मार्फत या पार्सलचे वितरण होणार आहे. शहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या              07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा.कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे.

जिल्ह्यातील ज्या आस्थापनावरील कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून काम करत आहेत. त्यांना त्या आस्थापनांची ओळखपत्र देण्यात यावेत. दर्शनी भागात आपले ओळखपत्र घेऊन पोलिसांना दाखवावे. पोलिस विनाकारण कोणावर कारवाई करणार नाही. आतापर्यंत 39 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारण नसताना बाहेर फिरणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात येईल,असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी दिलेल्या वेळेनुसार दुकाने उघडा व दुकाने बंद करा. नागरिकांचा परस्परांशी कमीत कमी संबंध येणे. यासाठी आपण हा लॉकडाऊन पाळत असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये लवकरच शहराच्या मोठ्या मैदानात भाजीबाजार घेण्याचा विचार सुरू आहे. तसेच नागरिकांना किराणा होम डिलिव्हरी करण्याची यंत्रणा सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी           डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.

कॉटन जिनिंग व्यवसायालाही आज सूट देण्यात आली आहे. हॉटेलचे किचन सकाळी व रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील. तसेच, सर्व नागरिकांनी आपल्या अगदी जवळच्या दुकानातूनच जीवनावश्यक वस्तूची खरेदी करावी, वस्तू खरेदी करण्यासाठी वाहन वापरता येणार नाही.

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सुधारित आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु,पेट्रोलपंप धारकांनी पेट्रोल पंपवर एका वेळेस 2 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाहीत. तसेच 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी. सदर आदेशाचा भंग झाल्यास संबंधित पेट्रोलपंप धारक व ग्राहक यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी निर्देश दिले आहे.


अफवांपासून दूर राहा मिळवा खरी आणि अधिकृत माहिती : जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत समाज माध्यमांना फॉलो करा

जिल्ह्यामध्ये कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रसार वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन महत्वपूर्ण पाऊले उचलत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वेळच्या वेळी योग्य त्या सूचना देण्यात येत आहे.

नागरिकांना कोरोना(कोविड-19) विषाणू संदर्भात योग्य माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अधिकृत समाज माध्यमे( सोशल मीडिया) सुरू केले आहे.

नागरिकांनी कोरोना आजारा संदर्भात अफवा पासून दूर राहण्यासाठी व अधिकृत माहितीसाठी प्रशासनाने जारी केलेल्या समाज माध्यमांना फॉलो करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

ही असणार अधिकृत समाज माध्यमे:

जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती कार्यालयाच्या District Corona Control Cell व Dio Chandrapur या फेसबूक पेजला, www.chanda.nic.in या संकेतस्थळाला तसेच @InfoChandrapur या ट्विटर हॅन्डलला, www.diochanda1.blogspot.in या ब्लॉगला फॉलो करु शकता.

चंद्रपूर पोलीस विभागाच्या www.chandrapurpolice.gov.in या संकेतस्थळाला,        Chandrapur Police या फेसबुक पेजला तसेच @SPChandrapur या ट्विटर हॅन्डलला नागरिकांनी फोलो करा.

जिल्हा परिषद चंद्रपूरच्या www.zpchandrapur.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला तसेच चंद्रपुर महानगरपालिकेच्या www.cmcchandrapur.com या संकेतस्थळाला तसेच chandrapur municipal corporation या फेसबुक पेजला फॉलो करावे.

डॉक्टर,नर्स,फार्मासिटिकल्स, रुग्णवाहिका,आरोग्य विभागाशी निगडीत अधिकारी व कर्मचारी आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्यांना कर्तव्य बजावताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास चंद्रपूर पोलीस विभागातर्फे 9404872100 हा संपर्क क्रमांक व व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क करावा.असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आरोग्य संबंधित त्रास निर्माण झाल्यास त्यांनी त्वरित  जिल्हा सामान्य रुग्णालय        07172-270669, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226, चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 07172-251597 किंवा टोल फ्री क्रमांक 1077, जिल्हा पोलिस यंत्रणेने देखील आपले क्रमांक जाहीर केले असून पोलीस यंत्रणेशी संपर्क साधायचा असल्यास 07172-273258,263100 या प्रमुख  क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.