आधी सावरकरांना भारतरत्न द्या; तुमचंही अभिनंदन करू; शिवसेनेनं भाजपला सुनावलं #savarkar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आधी सावरकरांना भारतरत्न द्या; तुमचंही अभिनंदन करू; शिवसेनेनं भाजपला सुनावलं #savarkar

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 

भारतीय जनता पक्षानं राज्याच्या विधानसभेत मांडलेला सावरकर गौरव प्रस्ताव आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमावर बोट ठेवून फेटाळून लावला. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या गौरवाचा दोन ओळींचा ठराव मांडावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपनं केली होती. मात्र, आधी सावरकरांना 'भारतरत्न' द्या. आम्ही तुमच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, असं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलं. त्यावरून विरोधकांनी सभागृहात जोरदार गदारोळ केला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभेनं सावरकर गौरव प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी भाजपनं अध्यक्षांकडं केली होती. कामकाज सुरू होताच सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची भाजपची भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यास अनुमोदन देताना काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या 'शिदोरी' मासिकातून सावरकरांबद्दल लिहिलेल्या आक्षेपार्ह लिखाणाचा उल्लेख केला. तसंच, शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची मागणी केली.

महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत, याची कल्पना असल्यानं सरकारला कोंडीत पकडण्याची भाजपची यामागची रणनीती होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी नियमावर बोट ठेवून हा प्रस्ताव फेटाळून लावला व पुढील कामकाज पुकारले. तत्पूर्वी, सत्ताधाऱ्यांकडून संसदीय कामकाजमंत्री अनिल परब व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. 'सावरकरांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान कोणीही नाकारत नाही. मात्र, त्यांच्याबद्दलची प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. व्यक्ती तितकी मतं असतात. इतरांचं मत आमच्यासारखंच असावं, हा आग्रह चुकीचा आहे. 

सावरकरांची गायी व बैलाबद्दलची मतं खूपच वेगळी आहेत. ते प्रखर विज्ञानवादी होते. ती सगळ्यांनाच पटतात असं नाही. अर्थात, त्यांच्या देशकार्याबद्दल आम्हाला आदरच आहे. मात्र, सावरकरांच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांना नेमका काय स्वार्थ साधायचा आहे हेच कळत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला. केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार असताना सावरकरांना 'भारतरत्न' का दिला गेला नाही, असा सवालही त्यांनी केला.

संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनीही भाजपवर टीका केली. 'सावरकरांना 'भारतरत्न' द्या. तुमच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही स्वत: मांडू,' असं त्यांनी विरोधकांना सांगितलं. त्यानंतर अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळला. त्यामुळं संतप्त झालेल्या भाजपच्या सदस्यांनी सभागृहात फलक फडकावत सरकारचा निषेध केला.
आधी सावरकरांना भारतरत्न द्या; तुमचंही अभिनंदन करू; शिवसेनेनं भाजपला सुनावलं