चितेगाव येथे तीन दिवसीय पहिल्या ग्रामगीता महोत्सवाचे उदघाटन.#rashtrsant tukdoji maharaj - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चितेगाव येथे तीन दिवसीय पहिल्या ग्रामगीता महोत्सवाचे उदघाटन.#rashtrsant tukdoji maharaj

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मुल 
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या स्मृती वर्षाच्यानिमित्ताने    चितेगाव येथे पहिल्या  ग्रामगीता  महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. श्रमिक  एल्गार प्रतिष्ठान चितेगाव  मध्ये  आयोजित या महोत्सवाच्या  प्रसंगी  आयोजक  ॲड. पारोमिता गोस्वामी,  श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष  विजय सिद्धावार, स्वागताध्यक्ष  डाॕ. कल्याणकुमार, कवी  सुखदेव चौथाले, कीर्तनकार शरद सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        
ग्रामगीता महोत्सव चितेगावात सुरू होणे ही ऐतिहासिक घटना असून अशक्य वाटणारी गोष्ट  चंद्रपूर जिल्ह्यात दारूचे दुकान बंद होतील, हे कुणालाही स्वप्नातही वाटले  नव्हते. मात्र ते कार्य  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या  कृपेने आणि विचारांने झाले, असे विजय सिध्दावार म्हणाले. स्वागताध्यक्ष डाॕ. कल्याणकुमार म्हणाले ,  राष्ट्रसंताचे साहित्य सर्वव्यापी तसेच  जागतिक दर्जाचे असून  राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव आणि  राष्ट्रभक्तीवर विशेषतः जास्त जोर दिला. नव्या पिढी पर्यंत हे पुरोगामी  विचार गेले पाहिजेत. ॲड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या ,  राष्ट्रसंताच्या शब्दांत जी मोठी  ताकद आहे त्याची अनुभूती विविध आंदोलनात आम्हाला दिसून  आली. म्हणूनच श्रमिक एल्गारच्या वतीने राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार प्रसार सातत्याने सुरू आहे.


कार्यक्रमाध्यक्ष बोढेकर म्हणाले , ग्रामगीता हा ग्रंथ म्हणजे राष्ट्रसंताच्या दीर्घ तपस्येचे व लोकसेवेचा  शाश्वत विचार आहे. ग्रामाच्या जडणघडणीसाठी लिहिला गेलेला हा परिवर्तनवादी ग्रंथ असून अलिकडे  ग्रामजीवनात आलेली  अवकळा  घालविण्यासाठी ग्रामगीता तत्त्व विचारांची कास धरावी लागेल. समूहजीवनाला  मूल्यत्व प्रदान करण्याचे  कार्य ह्या ग्रंथातून झालेले आहे. समाजोध्दाराची तळमळ लागलेल्या व्यक्तीला अचूक मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य  ग्रामगीतेत आहे, असे ते म्हणाले .  सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले तर आभार सुखदेव चौथाले यांनी मानले.  उदघाटन सत्रानंतर सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. प्रार्थनेवर चिंतन शरद महाराज  सहारे यांनी प्रस्तुत केले. रात्री खंजरी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.