युवतीला जाळणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला धडा शिकवू...#Hinganghat - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

युवतीला जाळणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला धडा शिकवू...#Hinganghat

Share This
पीडित युवती मातोश्री कुणावार महिला महाविद्यालयात बॉटनी विषयाची प्राध्यापक आहे. ती नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी हिंगणघाट येथील नंदोरी चौकातून पायी महाविद्यालयात जात होती. दरम्यान तिच्या मागावर असलेला एक युवक दुचाकीवर पाठीमागून आला.

खबरकट्टा / महाराष्ट्र : हिंगणघाट (जि. वर्धा) : 
महाविद्यालयात जात असताना एका प्राध्यापक युवतीला एका युवकाने पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. तिला उपचाराकरिता नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (ता. तीन) सकाळी साडेसातच्या सुमारास हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकाजवळ घडली. या घटनेनंतर संतप्त जमाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आला. त्यांनी युवतीवर पेट्रोल टाकणाऱ्या युवकाला आमच्याकडे सोपवा, आम्ही त्याला धडा शिकवू, अशी मागणी केली. पीडित युवती मातोश्री कुणावार महिला महाविद्यालयात बॉटनी विषयाची प्राध्यापक आहे. ती नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी हिंगणघाट येथील नंदोरी चौकातून पायी महाविद्यालयात जात होती. दरम्यान तिच्या मागावर असलेला एक युवक दुचाकीवर पाठीमागून आला. त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले. यावेळी कापड गुंडाळलेला टेंभा त्याच्यासोबत होता. त्याने या तरुणीचा पाठलाग करीत तिला काही कळण्यापूर्वी तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकत घटनास्थळावरून पळ काढला. यात ती गंभीररीत्या भाजली. तिच्या मागाहून येत असलेली तिची सहकारी प्राध्यापक आणि मार्गाने जाणाऱ्या युवकांनी धावपळ करून आग विझविली व येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले. या अमानवीय कृत्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. आरोपी विवाहित :
या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याचे लग्न झाले असून, त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. यापूर्वी, आरोपीने संबंधित युवतीसमोर बसमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आहे. 


आरोपीला बुट्टीबोरी येथून अटक :
या घटनेतील आरोपी विकेश ऊर्फ विक्की ज्ञानेश्‍वर नगराळे (वय 27, रा. दारोडा) याला बुट्टीबोरी येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडिता दारोडा या एकाच गावातील असल्याने या घटनेबाबत विविध चर्चा सुरू आहे. दरम्यान, येथे बैठकीनिमित्त आलेले पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करताना अधिकाऱ्यांना सखोल तपास करून कारवाईचे निर्देश दिले.

पाण्याच्या टाकीवर आंदोलन :हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याच्या मागणीकरिता "युवा परिवर्तन की आवाज' संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल दारुणकर यांनी तहसील कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी आमदार समीर कुणावार आणि शासकीय अधिकाऱ्यांनी पीडित युवतीला न्याय मिळवून देण्याकरिता पूर्ण प्रयत्न करणार असल्याची हमी दिल्यानंतर राहुल दारुणकर खाली उतरले.  आयजींसमोर उसळला जनआक्रोश :
पूर्वनियोजित पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे सोमवारी सकाळी शहरात आले होते. त्यांची पोलिस अधिकाऱ्यांसोबत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात बैठक सुरू होती. पोलिस अधीक्षक बसवराज तेली हेसुद्धा बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, प्राध्यापिकेवर झालेल्या पेट्रोल हल्ल्याने संतप्त झालेला जमाव या कार्यालयासमोर आला. 

विद्यार्थी आणि नागरिकांनी पोलिस महानिरीक्षकांसमोर आपल्यासंतप्त भावना व्यक्त केल्या. युवतीवर हल्ला करणाऱ्या युवकाला आमच्याकडे सोपवा, आम्ही त्याला धडा शिकवू, अशी मागणी त्यांनी केली. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे सांगत याबाबत वेळीच उपाययोजना राबविण्याची मागणी त्यांनी केली. यावर पोलिस महानिरीक्षकांनी येत्या काही दिवसांत यासंदर्भातील सर्व प्रश्‍नांबाबत बैठक आयोजित करण्याची हमी दिली. 


पीडितेवर नागपूर येथे ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या शरीराचा डोक्यापासून पोटापर्यंत चा भाग संपूर्ण भाजला असून तिने वाचा गमाविल्यानंतर आता दृष्टी सुद्धा गमावीन्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली असून, सोबतच श्वसननलिका सुद्धा क्षतिग्रस्त झाली असून मृत्यूशी झुंज देत आहे.