कुणबी समाजाचे पाऊल शेतकऱ्यांसाठी कौतुकास्पद आमदार सुधीर मुनगंटीवार : शेतकरी महोत्सवाचा विविध कार्यक्रमांनी समारोप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कुणबी समाजाचे पाऊल शेतकऱ्यांसाठी कौतुकास्पद आमदार सुधीर मुनगंटीवार : शेतकरी महोत्सवाचा विविध कार्यक्रमांनी समारोप

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

एका दाण्यापासून हजारो दाणे निर्माण करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहे. या शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणबी समाज एकवटला असून, त्यांनी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. भविष्यात जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील शेतकऱ्यांनाही चंद्रपुरातील महोत्सवातून कृषीविषयक वैज्ञानिक माहिती मिळेल, असा आशावाद व्यक्त करीत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे मत माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

कुणबी समाज मंडळातर्फे चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित शेतकरी महोत्सवाचा रविवारी (ता. ९) विविध कार्यक्रमांनी समारोप झाला. यावेळी मुनगंटीवार बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. पुरुषोत्तम सातुपते होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा परिषद सदस्य देवराव भोंगळे, उपमहापौर राहुल पावडे, नगरसेवक संदीप आवारी, श्रीधरराव मालेकर, विनोद पिंपळशेंडे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, नवनिर्वाचित उपमहापौर राहुल पावडे यांचा शाल, श्रीफळ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, कुणबी समाज पारंपरिक व्यवसाय करीत आहे. शेतीला जोडधंद्यांची जोड देणे गरजेचे आहे. आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती व्यवसायात प्रगती करावी.


शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या उत्पादनास मार्केटींग करण्यासाठी स्थळ उपलब्ध व्हावे, या उद्देशातून महोत्सवाचे आयोजन केले. शेतकऱ्यांची शहरी विकासाशी नाळ जोडावी यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आयोजन समिती गेल्या तीन महिन्यांपासून अथक परिश्रम घेत होती. या महोत्सवाला लाभलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून आनंद झाला. भविष्यात पोशिद्याच्या प्रगतीसाठी असाच आमचा प्रयत्न सुरु राहणार असल्याचे अ‍ॅड. सातपुते यांनी प्रास्ताविकपर भाषणातून सांगितले.

महोत्सवातील मोफत आरोग्य व रोगनिदान शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. गरजेनुसार रुग्णांना औषधी वितरित करण्यात आली. यासाठी सामान्य रूग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जवळपास ७० डॉक्टरांच्या चमूने सेवा दिली. त्यासोबतच रक्तदान शिबिरसुद्धा घेण्यात आले. या महोत्सवाला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार सुभाष धोटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आयोजनाचे कौतुक केले. संचालन मेघा धोटे, केतन जुनघरे यांनी, तर आभार उमाकांत धांडे यांनी मानले. सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

ओबीसी जनगणनेसाठी ठराव -
केंद्र शासनाच्या वतीने २०२१ मध्ये जनगणना होऊ घातली आहे. मात्र, ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, यासाठी आयोजन समितीचे अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी समारोपीय कार्यक्रमात ठराव मांडला. तो सर्वानुमते संमत करण्यात आला.


स्टॉलला उत्स्फुर्त प्रतिसाद -
महोत्सवात कृषीपयोगी यंत्रसामुग्री, विविध खाद्यपदार्थ, शासकीय योजनांची माहिती, ओबीसी जनजागृती, व्यसनमुक्ती, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आदी स्टॉल लावण्यात आले होते. यात जिल्ह्यासोबतच इतर जिल्ह्यातूनसुध्दा बचतगटांचे स्टॉल लावण्यात आले. या स्टॉलला जिल्ह्यातील व शहरातील हजारो नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान -
जिल्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी महोत्सवात आले होते. या शेतकऱ्यांनी विविध कृषीविषयक स्टॉलला भेट देत माहिती जाणून घेतली. एवढेच नाही तर विविध चर्चासत्राला उपस्थिती दर्शवून विविध तज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेतले. आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.