माणिकगड कंपनी विरूद्ध कारवाई करून न्याय द्या. वृद्ध देऊची मरणावस्थेत शेवटची इच्छा/पोलिसात विनंतीपुर्वक तक्रार. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माणिकगड कंपनी विरूद्ध कारवाई करून न्याय द्या. वृद्ध देऊची मरणावस्थेत शेवटची इच्छा/पोलिसात विनंतीपुर्वक तक्रार.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -


माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनाच्या शोषणामुळे माझे अख्खे कुटुंब उध्वस्त झाले परिणामी कुटुंबावर भीक मागण्याची पाळी आली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून न्याय हक्कासाठी सतत संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने माझी ही अवस्था झाली असून करीता मरणापुर्वी नम्र विनंती आहे की,माझ्यावर झालेल्या अन्यायाची शिक्षा म्हणून माणिकगड सिमेंट कंपनी विरूद्ध कायदेशीर कारवाई करून माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी कंपनीच्या अन्याग्रस्त कुसुंबी येथील वृद्ध आदिवासी देऊ कुळमेथे यांनी गडचांदूर पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनातून केली आहे.

वृद्ध असल्याने उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्याला  जिल्हा रुग्णालयातून परत रुग्णवाहिकेने कुसुंबी येथे नेत असताना त्याच्या इच्छेनुसार गडचांदूर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी आणण्यात आले होते.
    
कुसुंबी येथील ८ एकर शेत जमीन माणिकगड सिमेंट कंपनीने नासधुस करून बळकाविल्याने अख्खे कुटुंब उघड्यावर पडले.यामुळे उपासमारीची पाळी ओढवली आहे.मरणावस्थेत असलेल्या देऊ कुळमेथे यांनी गेल्या वर्ष २०१३ पासून त्याच्यावर झालेले अन्याय व जमीनी हिरावल्या संबंधी अनेक तक्रारी पोलिस व महसूल प्रशासनात केल्या.

न्याय मागणीसाठी राजूरा येथे ११ दिवस आमरण उपोषण केले.मात्र दरवेळी निव्वळ आश्वासनांची खैरात वाटली गेली.आता २० महिन्याचा कालावधी लोटला तरीपण कोणताही निर्णय झालेला नाही.उपचाराला पैसे नाही म्हणून शेवटी कुटुंबानी वैतागून आजारी देऊ कुळमेथेला १५ फेब्रुवारी रोजी राजूरा उपविभागीय अधिकार्‍यांच्या कार्यालयापुढे भिकमांगो आंदोलन केले.सोबत दोषींवर कारवाईची मागणी केली.त्यावेळी वृद्ध देऊला राजूरा पोलिसांनी जबरदस्तीने खाटेवरून उचलून जिल्हा रुग्णालयात भरती केले.


आणि अंदाजे २० तासापर्यंत त्याच्या उपचार झाला नसल्याने देऊची प्रकृती अत्यंत खालावली.याची दखल काही  लोकप्रतिनिधींनी सदर बाब जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या निदर्शनात आणून दिले आणि  उपचारासाठी भाग पाडले.मात्र कंपनीची मुजोरी व तक्रारीची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने देऊ कुळमेथे कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाचा बळी जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.सदर अन्यायाविरोधात समाज भावना अत्यंत तीव्र असून अनेक संघटनांनी या विषयी निषेध नोंदविला आहे.

कायद्याप्रमाणे शासन-प्रशासन दोषींवर कारवाई करणार की,आदिवासींचे शोषण व हाल असेच सुरू राहतील असा प्रश्न जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी उपस्थित केला आहे.माणिकगड सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभार व मुजोरीमुळे सतत आदिवासींवर अन्याय,अत्याचार व सुरू असलेल्या छळाचे पडसाद आता गावागावात उमटू लागल्याचे पहायला मिळत आहे.शासनाकडून कुसुंबी येथील आदिवासी,कोलाम कुटुंब आणि विशेषतः मरणावस्थेत असलेल्या वृद्ध देऊ कुळमेथेला जिवंतपणी न्याय मिळणार अथवा नाही आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.