पुढील दोन वर्षे एकही नव्या इंजिनीयरिंग महाविद्यालयाला परवानगी नाही : एआयसीटीई चा निर्णय #aicte - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुढील दोन वर्षे एकही नव्या इंजिनीयरिंग महाविद्यालयाला परवानगी नाही : एआयसीटीई चा निर्णय #aicte

Share This
खबरकट्टा / शैक्षणिक :
देशातील अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) महाविद्यालयांमध्ये एकूण २७ लाख जागा उपलब्ध आहेत, परंतु २०१९-२० या शैक्षणिक वर्षात फक्त १३ लाख विद्यार्थ्यांनीच इंजिनीयरिंगला प्रवेश घेतला. म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) पुढील दोन वर्षे एकाही नव्या इंजिनीयरिंग महाविद्यालयाला परवानगी द्यायची नाही असा निर्णय घेतला आहे.

देशातील अनेक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी. टेक) हा अभ्यासक्रम चालवला जातो. तेथील अर्ध्याहून अधिक जागा चालू शैक्षणिक वर्षात रिक्त राहिल्या. त्यामुळे सन २०२० पर्यंत नव्या इंजिनीयरिंग महाविद्यालयांना परवानगी देऊ नये अशी शिफारस 'एआयसीटीई'च्या समितीने केली. आयआयटी हैदराबादचे अध्यक्ष बीव्हीआर मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.

'एआयसीटीई'ने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. जागा जास्त आणि प्रवेशेच्छुक विद्यार्थी कमी असल्याने चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला गेला असे या समितीला दिसून आल्याचे अहवालात नमूद आहे. 

२०१५ ते २०१९ यादरम्यान ५१८ इंजिनीयरिंग महाविद्यालये बंद झाली तर २०१९ मध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून सहा लाख पदवीधरांना रोजगार मिळाले, असेही अहवालात म्हटले आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी १४ लाख, डिप्लोमासाठी ११ लाख आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १.८ लाख जागा उपलब्ध आहेत, मात्र फक्त ७ लाख विद्यार्थ्यांनीच पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला.