हंसराज अहिर यांच्या नववर्षाच्या जाहिरातीच्या निमित्त्याने "अहिर-मुनगंटीवार"वाद चव्हाट्यावर : #sudhirmungantiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हंसराज अहिर यांच्या नववर्षाच्या जाहिरातीच्या निमित्त्याने "अहिर-मुनगंटीवार"वाद चव्हाट्यावर : #sudhirmungantiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर :

महाराष्ट्रात सत्तांतरानंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याप्रमाणे विरोधीपक्ष भाजपमधील नाराजांची संख्याही वाढत आहे. सत्तेत असताना भाजपचे जे नाराज नेते शांत होते, ते आता जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. 


चंद्रपूरमध्ये देखील काहीशी अशीच स्थिती तयार झाली आहे. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते हंसराज अहिर यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिलेल्या वर्तमानपत्राच्या जाहिरातीत आपला नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. 

हंसराज यांनी दिलेल्या जाहिरातीवरुन सुधीर मुनगंटीवार गायब आहेत. मात्र, मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेआधी भाजप होता आणि नंतर काँग्रेस आलं यावर लक्ष वेधत त्यांनी या जाहिरातीत चंद्रपूर आणि वरोरातील निकालावर प्रश्नचिन्ह केलं आहे.  यातून त्यांनी थेट सुधीर मुनगंटीवर यांच्यावरच निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. अहिर यांनी त्यांचा पराभव घडवून आणण्यात आला आहे, असं गृहित धरुनच संबंधित जाहिरात दिल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. 

हंसराज अहिर यांनी या जाहिरातीच्या निमित्ताने भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरच निशाणा साधल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार संजय तायडे यांनी व्यक्त केलं. अहिर यांच्या जाहिरातीतून त्यांची पक्षातील काही नेत्यांबद्दलची नाराज, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची खदखद बाहेर आल्याची जोरदार चर्चा चंद्रपूरमध्ये सुरु आहे.


अहिर यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातींमध्ये भाजपच्या पराभवाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. सर्व सत्तास्थाने भाजपच्या ताब्यात असताना देखील लोकसभेत भाजपचा पाडाव का झाला? असंही अहिर यांनी विचारलं आहे. तसेच कार्यकर्त्यांना परिश्रम करण्याचंही आवाहन केले आहे.

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहिर नाराज असल्याची शंका व्यक्त होत आहे. अहिर यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून दिलेल्या नववर्षाच्या शुभेच्छा वाचून चंद्रपूरकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

या जाहिरातीचा मथळ्यात म्हटले आहे, 'पक्षनिष्ठ भाजप कार्यकर्ते, मतदारांसाठी माहिती, चिंतन, चिंता आणि सावधतेसाठी'. यात त्यांनी संपूर्ण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असूनही निवडणुकीत भाजपला फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील 4 मतदारसंघात पिछाडी कशी मिळाली असाही सवाल विचारण्यात आला. विशेष म्हणजे हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात सख्य नसल्याचं सर्वश्रृत आहे. 


सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात हंसराज अहिर यांना लोकसभा निवडणुकीत तब्बल 31 हजारांची पिछाडी मिळाली होती. त्यामुळे हंसराज अहिर यांनी जाहिरातीच्या माध्यमातून मुनगंटीवार यांच्यावरच निशाणा साधल्याची चर्चा आहे. या जाहिरातीचा शेवट मात्र पुढच्या काळात अधिक परिश्रम करू, पक्षाला सत्तास्थानी नेऊ असा करण्यात आला आहे.