खबरकट्टा /चंद्रपूर: जिवती
तालुक्यातील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळेच्या अधिक्षकांनी आत्महत्या केल्याची घटना नकतीच घडली. या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी यातील दोषींना अटक करण्यात आली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. आत्महत्यास प्रवृत्त करणार्या मुख्य आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी पीडित लता सुभाष पवार हिने केलेले आहे.
अन्यथा ८ जानेवारीपासून संपूर्ण कुटूंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमनार व जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना पीडित कुटुंबियांनी मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्याची विनंती निवेदनाद्वारे केलेली आहे. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक सरकार्यवाह सुधाकर अडबाले, दिगंबर कुरेकार, केशव नगराळे यांची उपस्थिती होती.
आत्महत्याग्रस्त अधीक्षक सुभाष पवार कर्तव्यावर असताना शाळेच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती . ती पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे. सदर सुसाईट नोटची प्रत पिडिताची पत्नी लता पवार यांनी मागणी करूनही देण्यात आली नाही. या प्रकरणात दोषी असलेल्या संपूर्ण कर्मचार्यांची चौकाशी करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे . या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार आजारी असल्याचे ढोंग करीत आहेत. तर दुसरा आरोपी गडचांदूर, जिवती परिसरात राजरोसपणे फिरत असल्याचा आरोप करण्यात आला असून पोलीस प्रशासन त्याला अटक न करता आम्हालाच अटक करण्याबाबत भ्रमणध्वनीव्दारे धमकावत असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासमवेत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पिडीताची पत्नी, नातेवाईक तसेच उपस्थित शिष्टमंडळाने दिला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणानंतर आरोपींना अटक करावी , या मागणीसाठी विविध संघटनांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलनही करण्यात आले . मात्र अद्यापही प्रशासनाने पाहिजे तशी दखल घेतली नसल्याचे आरोप केला जात आहे.