खबरकट्टा / चंद्रपूर :
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत बोलावून घेऊ शकतात. मोदींच्या मंत्रिमंडळात फडणवीस यांना अर्थमंत्री केले जाऊ शकते. मोदी यांच्या अंतःस्थ गोटातून ही माहिती मिळाली तेव्हा अजिबात आश्चर्य वाटले नाही. विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत.
हा त्यांचा अखेरचा अर्थसंकल्प असेल अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सीतारामन कमी पडल्या ह्याबाबत भाजपच्या हायकमांडमध्ये एकमत झाले आहे. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नवा अर्थमंत्री शोधण्याची सूचना मोदींना केल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झालेले असतील. अनेक राज्यांतील नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातून फडणवीस यांच्या नावाची जोरात चर्चा आहे.
देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दल सारेच चिंतेत आहेत. विकासदर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. विदेशी गुंतवणूक ठप्प आहे.त्यामुळे तरुण हातांना काम देण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. नव्या दमाच्या चेहऱ्याकडे अर्थ खाते देण्याचा विचार मोदींनी चालवला आहे. त्यांचा शोध देवेंद्र फडणवीस यांच्यापाशी थांबू शकतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मोदींची गाठ फडणवीस यांच्याशी पडली. नागपुरातल्या जाहीर सभेत मोदींनी ‘कोहिनूर’ ह्या शब्दात फडणवीस यांचा गौरव केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.