खबरकट्टा / चंद्रपूर :संपादकीय
गडचांदूर नगरपरिषद निवडणूकीचा निकाल लागला असून यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने बाजी मारली असून नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सविता टेकाम विजयी झाल्या आहेत.
यामध्ये प्रभाग क्र.६ मध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देताना पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सचिन गुरनुले यांना फक्त त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याचे सांगून उमेदवारी नाकारली परंतु हाती आलेल्या निकालावरून भाजपाचे अधिकृत उमेदवार गोपाल मालपाणी यांना २१५ व सचिन गुरनुले यांना २०० मतदान मिळाले.
एकीकडे गोपाल मालपाणी यांची आर्थिक बाजू भक्कम असताना,त्यांच्या प्रभागात जिल्ह्याचे नेते श्री.सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहिर या दोन्ही नेत्यांच्या मोठमोठ्या सभा झाल्या तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांच्या प्रभागात ठाण मांडून बसले होते,तसेच पक्षाचे संपूर्ण पाठबळ त्यांच्या सोबत होते,तसेच प्रभागात सुद्धा देवराव भोंगळे,संध्याताई गुरनुले यांच्या सभा झाल्या,तसेच पक्षाचे संपूर्ण नियोजन त्यांच्या सोबत होते,असे असताना सुद्धा गोपाल मालपाणी यांना २१५ मतदान मिळाले.
जेव्हा प्रभाग क्र.६ ची उमेदवारी देताना पक्षासमोर दोन नावे असताना जिल्ह्याचे पदाधिकारी सचिन गुरनुले यांच्या नावावर सहमत असताना फक्त शहरातील भाजपाचे शहर अध्यक्ष व त्यांच्याच प्रभागातील पक्षाचे जेष्ठ नेते यांच्या म्हणण्यानुसार सचिन गुरनुले यांची उमेदवारी नाकारत गोपाल मालपाणी यांना उमेदवारी देण्यात आली,सचिन गुरनुले यांना फक्त त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याचे सांगून त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली,परंतु यामागेसुद्धा वेगळे राजकीय कारण असल्याचे सांगितले जात आहे.
सचिन गुरनुले यांनी मागील गेल्या १० वर्षापासून पक्षाचे सक्रियपणे कार्य करत आहे.त्यांनी गडचांदूर नगरपरिषद करिता पूर्वीपासून तयारी सुद्धा केलेली होती परंतु ऐनवेळी त्यांची तिकिट कापल्यामुळे शहरातील पक्षाशी जुळलेला युवा वर्ग नाराज झाला,त्यांच्यासुद्धा फटका भाजपाला इतर प्रभागात बसला.
राजकारणात काम करीत असताना गरिबांच्या मुलाने राजकारण करू नये का हा प्रश्न शहरातील भाजप नेत्यांच्या विचारसरणीमुळे उभा राहतो.परंतु पक्षाने ज्यांचीआर्थिक बाजू भक्कम आहे त्यांना उमेदवारी देऊन सुद्धा पक्षाच्या शहरात भाजपाच्या फक्त २ च जागा निवडून आल्या आहेत.
तसेच १७ पैकी ८ जागेवर भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहे.९ जागेवर दुसऱ्या स्थानावर आहेत,परंतु तिथे सुद्धा विजयी उमेदवारांच्या आणि पराभुत उमेदवरांच्या मतांमध्ये खूप अंतर आहेत,तसेच अनेक ठिकाणी तिकीट वाटपात जिल्हा पदाधिकारी व शहर भाजपातील पदाधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ नसताना,केवळ शहरातील भाजप नेत्यांच्या हट्टामुळे त्या जागा दिल्या गेल्या त्यामुळे गडचांदूर शहरातील भाजप नेत्यांना आत्मचिंतनाची गरज आहे.