वेकोली कामगाराचा संप यशस्वी - 80 टक्के प्रतिसाद #wcl - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वेकोली कामगाराचा संप यशस्वी - 80 टक्के प्रतिसाद #wcl

Share This
 • बल्लारपुर क्षेत्रातील उत्पादन, डिसपँच, कंत्राटी काम, क्षेत्रिय कार्यालय बंद.
 • आयटक,इंटक,एचएमएस व सिटू या चार कामगार संघटनांचे आंदोलन - भामसंचे सदस्य कामावर.
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
               
केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत असून कामगार कायदे बदलून नविन चार कोड मध्ये परिवर्तन, खाजगीकरण व आऊटसोर्सींग, वाढती बेरोजगारी, ठेकेदारी प्रथा यासह अनेक बाबतीत कामगारांवर अन्याय केला जात आहे. केंद्र सरकार उद्योगपती  धार्जिणे निर्णय घेत असल्याने कामगारांचे शोषण होत आहे. या सर्व कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी आज दिनांक ८ जानेवारीला झालेल्या देशव्यापी संपात बल्लारपुर क्षेत्रीय वेकोलिच्या कोळसा खाणीत जवळपास अंशी टक्के प्रतिसाद मिळाला. 

       
बल्लारपूर क्षेत्रात सकाळ व दुपारच्या पाळीत इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या चार कामगार संघटनेचे कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले. मात्र भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे सदस्य कामावर हजर झाले. बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती एक्सपान्शन, गोवरी, पोवनी, गोवरी डीप, बल्लारपूर या ओपनकास्ट व सास्ती, बल्लारपूर भूमिगत तसेच क्षेत्रीय कार्यालय या सर्व कार्यालय आणि माईन्समध्ये फार कमी उपस्थिती होती. व्यवस्थापनाने काही कामगारांना बोलावून उत्पादन सुरु करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यामूळे कोळसा व माती उत्खनन किरकोळ प्रमाणात झाले. कोळसा डिसपँचही ठप्प होते,  ट्रक अथवा रेल्वे वँगन मध्ये कोळसा भरण्याचे काम थांबले होते.
           
क्षेत्रिय कार्यालयासमोर बोलतांना इंटकचे नेते शंकरदास म्हणाले की, वेकोलि कामगारांना पस्तीस वर्ष नौकरी झालेली असल्यास सेवानिवृत्तीचा प्रस्ताव आणला आहे. बोनस सिलींग न हटविल्याने कामगारांवर अन्याय होत आहे, ग्रँच्यूइटी विस लाखापेक्षा अधिक करण्याची मागणी आहे. मात्र सरकार कामगारांवर अन्याय करीत असून कामगार विरोधी निर्णय घेत आहे, असेही मत शंकरदास यांनी व्यक्त केले. सुदर्शन डोहे यांनी सरकार श्रम करणा-या कामगारांचे हक्क हिरावून घेत असुन कोळसा उद्योगातील कामगारांनी एकजूट ठेवून संघर्ष करण्यास सिध्द व्हावे, असे आवाहन केले.
         
वेकोलिचे व्यवस्थापकीय संचालकांनी सुचना देऊन संपात सहभागी न होंण्याचे आवाहन केले, बल्लारपूर व्यवस्थापनाने नोटीस काढून कामगारांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आणि संपात भाग घेतल्यास कार्यवाही करण्याची सूचना दिली. मात्र कामगारांनी ही विनंती घुडकावून आंदोलनात सहभाग घेतला.

             
या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे केंद्रिय अध्यक्ष नंदकिशोर म्हस्के, इंटकचे क्षेत्रिय अध्यक्ष आर शंकरदास, सुदर्शन डोहे, मधुकर ठाकरे, रायलिंगू झुपाका, दिलीप कनकूलवार, रामनरेश यादव, ईश्वर गिरी, एचएमएसचे अशोक चिवंडे, लोमेश लाडे, प्यारेलाल पुंडे, संग्रामसिंह, सिटूचे शेख जाहिद, गणपत कुडे यांनी केले.

कामगार संघटना संपविण्याचा डाव : केंद्र सरकार सतत कामगार विरोधी व जनविरोधी भूमिका घेत असुन सार्वजनिक व सरकारी उद्योग संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. शंभर टक्के एफडीआय सह श्रमकायद्यात बदल करुन कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आहे. यामुळे  निर्णयामुळे देशातील कोळसा उद्योग कामगारांत संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या विकासात सार्वजनिक उद्योगांचे मोठे स्थान असून 1972 मध्ये या कोळसा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. परंतू सरकार आता हे सर्व उद्योग उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता श्रम कायद्यात बदल केल्याने कामगार संघटना बनविण्याचा अधिकार संपणार आहे.