अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आडनावावरुन केलेल्या ट्विटमुळं शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. पुण्यातील पिंपरीमध्ये शिवसेना आघाडीच्या वतीने अमृता फडणवीस यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.
फक्त ठाकरे आडनाव असल्याने कोणीही ठाकरे होत नाही, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली होती.
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे आणि चप्पल मारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या ट्विटचा निषेध नोंदवला. ज्या पोस्टरवर हे जोडे मारण्यात आले त्यावर देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो होता. ‘राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा’ अशा आशयाच्या पोस्टरसह घोषणाही देण्यात आल्या.
अमृताताई, खरं तर पराभवामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून आता आपण स्वतः सावरून, माजी मुख्यमंत्र्यांनादेखील मानसिक आधार द्यायला हवा होता पण साराचं अंधार दिसतोय आपल्या विचारात, अशी बोचरी टीका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांवर केली आहे.
दरम्यान, अमृता फडणवीसांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग देखील केलं होतं. त्यानंतर त्यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला गेला.