खबरकट्टा /नागपूर –
चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळेत कार्यरत असलेले वस्तीगृह अधीक्षक एस.एस. पवार यांनी संस्थाचालक, प्राचार्य व संस्थाचालकांचे विद्यालयामध्ये कार्यरत असलेले नातेवाईक शिक्षक यांच्या जाचाला कंटाळून शालेय परिसरातच आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 25 डिसेंबर 2019 रोजी घडली.
या घटनेला जबाबदार असणाऱ्या व एस. एस.पवार यांना मारझोड करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्वच लोकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी विदर्भ शिक्षक संघाच्या वतीने आज शिक्षक उपसंचालक कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
संघटनेचे नागपुर जिल्हाध्यक्ष श्री. गजानन भोरळ, सरकार्यवाह पृथ्वीराज चव्हाण, प्रांतीय महिला आघाडीप्रमुख करिष्मा गलानी व किसन पार्टीचे अध्यक्ष महेंद्र धावडे यांच्या नेतृत्वामध्ये संघटनेच्या वतीने निवेदन देताना सदर संस्थेवर सुद्धा प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी अशीही मागणी केली.
सोबतच मृत श्री. पवार यांच्या पत्नीला तात्काळ अनुकंपा तत्त्वावर नोकरी देऊन कुटुंबाला आधार द्यावा व असे न झाल्यास विदर्भ शिक्षक संघाच्या वतीने बेमुदत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे मनीष निंबाळकर, विजय काळे, रंजना चराटे,श्रीराम देशपांडे वाघाडे, विलास सत्ताई, विलास जाधव व अजय पांडे उपस्थित होते.