आमदारांची लॉबिंग : ठाकरे सरकारचा उद्या विस्तार?; ३६ मंत्री शपथ घेणार? #Ministryofmahaharastra - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आमदारांची लॉबिंग : ठाकरे सरकारचा उद्या विस्तार?; ३६ मंत्री शपथ घेणार? #Ministryofmahaharastra

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा उद्या पहिला विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून त्यात ८ राज्यमंत्र्यांचाही समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा अधिवेशनानंतर विस्तार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानुसार उद्या हा विस्तार होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ठाकरे मंत्रिमंडळाच्या पहिल्यावहिल्या विस्तारात शिवेसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १३-१३ मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. त्यात दोन्ही पक्षाच्या प्रत्येकी १० कॅबिनेट आणि प्रत्येकी ३ राज्यमंत्र्यांचा समावेश असेल. तर काँग्रेसच्या एकूण १० मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून त्यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागावी म्हणून आमदारांनीही लॉबिंग सुरू केली असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून काँग्रेस आमदारांनीही लॉबिंग सुरू केली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण कालच दिल्लीत दाखल झाले असून काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची ते भेट घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे दोन्ही नेते मोठं खातं घेण्यासाठी लॉबिंग करत असून अशोक चव्हाण यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ऊर्जा खातं मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी काल काँगेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणूगोपाल आणि अहमद पटेल यांची भेट घेऊन राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, सतेज पाटील, अमित देशमुख, के. सी. पाडवी आणि विश्वजीत कदम यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.तर शिवसेनेकडून रामदास कदम, अॅड. अनिल परब, निलम गोऱ्हे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, अब्दुल सत्तार, भास्कर जाधव आणि दीपक केसरकर यांची तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, जितेंद्र आव्हाड, धर्मरावबाबा आत्राम, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे, भारत भालके आणि हसन मुश्रीफ यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : भाजप आणि मुनगंटिवार सत्तेवरून गेले; इकडे चंद्रपुरात मद्यशौकिनांच्या आशा पल्लवित : वाचा - राज्यातील सत्ताबदलाचा असाही परिणाम !