खबरकट्टा / चंद्रपूर :
जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय व सेवा यांची गणना करण्यासाठी जिल्ह्यात २६ नोव्हेंबर पासून सातव्या आर्थिक गणनेला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रव्यापी ही मोहीम असून यासाठी आपल्या घरापर्यंत येणार्या प्रगणकाला योग्य माहिती द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आज येथे केले.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयामार्फत ही मोहिम राबवण्यात येत आहे. कृषी, खानकाम, वस्तू निर्माण, पाणी पुरवठा, बांधकाम, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार, वाहतूक, साठवण, उपाहारगृहे, हॉटेल, माहिती व दळणवळण संदर्भातील सेवा, वित्तीय व विमा सेवा, स्थावर मालमत्तेसंबंधीचे कार्य, व्यावसायिक, वैज्ञानिक व तांत्रिक कार्य, प्रशासकीय व आधार सेवा कार्य शैक्षणिक मानवी आरोग्य व सामाजिक कार्य, कला, करमणूक, क्रीडा, मनोरंजन व अन्य कार्यात सहभागी असणार्या आस्थापनाची व नियमित काम करणार्या व्यक्तींची माहिती यामार्फत घेण्यात येते.
कॉमन सर्विस सेंटर अर्थात सी.एस.सी. या यंत्रणेमार्फत आर्थिक गणनेचे काम करण्यात येत असून त्यांच्या मार्फतच प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रगणक आपले ओळखपत्र दाखवून जिल्हाभरातून घराघरातून माहिती गोळा करणार आहे. या कर्मचार्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी यावेळी केले.