खबरकट्टा / सामाजिक :गडचांदूर -
लग्न हे दोन जीवांचे अनमोल नाते मानले जाते. परंतु, हे नाते जोडताना दोघांच्या हितापेक्षा सामाजिक धारणा व रूढी जेव्हा समोर येतात तेव्हा सामाजिक संघर्ष बघायला मिळतो. आपल्या समाजात मुलीच्या मताला फारसे महत्व दिल्या जात नाही आणि बऱ्याचदा मुलींना आवडणारा मुलगा दुसऱ्या जातीचा असला की, मनाविरुद्ध लग्न करावे लागते.
गडचांदूर येथील एका उच्च शिक्षित युवकाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. मुलगा हा अनुसूचित जातीचा तर मुलगी व्हिजेएनटी समाजाची..! यामध्ये सुशिक्षित असलेल्या मुलीच्या घरून केवळ जातीमुळे विरोध होण्याचा कटू अनुभव आल्याने एका नवनियुक्त अधिकाऱ्याने स्वतःचे व मुलीचे नाव न सांगण्याच्या अटीवरून खंत व्यक्त केली आहे.
लग्नसराईत 'जात' फॅक्टर महत्वाचा मानला जात असला तरी आता नव्या पिढीत अनेक प्रेमी युगल आंतरजातीय विवाह करताना दिसतात. लग्न करताना मुलगा उच्च शिक्षित व शासकीय नोकरीत असावा अशी मध्यमवर्गीय परिवारातील मुलीच्या पाल्याची इच्छा असते. परंतु, कित्येकदा शिक्षण व शासकीय नोकरी असून देखील केवळ जात वेगळी असल्याने प्रेमी युगलांना लग्नापासून वंचित राहावे लागते.
याबाबतचा फटका नव्याने अधिकारी म्हणून रुजू झालेल्या मुलाला व अभियांत्रीकीचे शिक्षण पूर्ण झालेल्या मुलीला बसला आहे. समाजात असे अनेक प्रकार घडत असतात. जो पर्यंत आंतर जातीय विवाहांना सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नाही, तोपर्यंत जात व्यवस्था संपुष्टात येणार नाही, असे मत तरुणाई व्यक्त करत आहे.
दरम्यान, लग्न करत असताना जातीपेक्षा मुलीचे हिताला प्राधान्य दिलं पाहिजे. निर्व्यसनी, आर्थिक दृष्ट्या सक्षम व मुलीवर प्रेम करणारा मुलगा नवरा म्हणून भेटत असेल तर त्याबाबतीस प्राधान्य दिले पाहिजे. समाजातील सुशिक्षित मानल्या जाणाऱ्या वडीलधाऱ्या शिक्षक, डॉक्टर, वकील, पत्रकार,अभियांत्रिक मंडळींनी याबाबतीत पुढाकार घेतला पाहिजे, असे मत तरुण व्यक्त करत आहेत.
सध्या लग्नसराईचे वातावरण असून समाज जातीपलीकडे जाऊन मुला-मुलीच्या हिताचा विचार करणार का..? हा मुळात प्रश्न आहे.