खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -
निमणी येथील सौ.सुनीता टेकाम ही महिला एमिलोब्लास्टोमा कॅन्सर या आजाराने मागील काही दिवसांपासून आजारी आहे.घरची परिस्थिती इतकी नाजुक आहे की औषधोपचार करण्यासाठी सुद्धा तिच्याकडे पैसे नाहीत.तिला दोन लहान मुले आहेत.
गावकरी मंडळींकडून काही रक्कम गोळा करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय नागपूर येथे ऑपरेशन करण्यासाठी नेले असता,सर्व शरीराच्या चाचण्या केल्यानंतर तिला "एमिलोब्लास्टोमा कॅन्सर" हा आजार आढळला. परंतु शासनाच्या "महात्मा फुले जीवनदायी" योजनेत ही बिमारी येत नसल्यामुळे त्यांनी पुढील उपचार करण्याकरिता असमर्थता दर्शविली.नंतर सेवाग्राम वर्धा इथे चाचण्या केल्या, तिथे सुध्दा दोन दिवस भरती करण्यात आले व नंतर इथे ऑपरेशन होणार नाही असं सांगितले असल्याने आता तीला पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज होती.
निमणी गावचे उपसरपंच उमेशभाऊ राजूरकर यांनी आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार दि.29.12.2019 रोजी नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था,चंद्रपूरच्या वतीने ₹ 25000/- हजारांचा धनादेश सौ.सुनीता टेकाम यांना सुपूर्द करण्यात आला.सामाजिक जीवन जगतांना नाते आपुलकीचे संस्थेने जोळलेले हे मदतीचे नाते खरच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे असे गावकऱ्यांच्या तोंडी शब्द होते.सामाजिक ऐक्याची भावना रुजविण्यास नाते आपुलकीचे संस्था आपल्या नावाप्रमाणेच नाव सार्थ ठरवीत आहे हे निश्चित.