नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील यावरून अद्याप संभ्रम आहे. सध्या एकाच आठवड्याचे कामकाज ठरले आहे. आज मंगळवारी (ता. 10) मुंबईला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून यात अधिवेशनाच्या कामकाजाबद्दल निर्णय घेण्यात येईल. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे अधिवेशनाच्या कामकाजाबाबत विरोधी पक्ष काय भूमिका घेते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. विरोधकांच्या धारदार प्रश्नांनाही सामोरे जावे लागेल. मुख्यमंत्री याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचेच राहणार असल्याची चर्चा आहे. यावरून सरकारवर टीकाही होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नागपुरातील पहिले अधिवेशन सव्वा दोन आठवडे चालले होते. त्यामुळे यावेळी किमान दोन आठवडे तरी अधिवेशन चालावे, अशी मागणी होत आहे. उद्या मंगळवारला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईला होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते.
ख्रिसमसपूर्वी अधिवेशन संपविण्याचा प्रयत्न:
बैठकीला मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. ख्रिसमसपूर्वी अधिवेशन संपविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे एकच आठवडा हे अधिवेशन चालणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी एकदा अधिवेशन सहाच दिवस चालले आहे. विरोधी पक्षाने आग्रही भूमिका घेतल्यास अधिवेशनाच्या कामकाजात वाढ होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.