रोपवाटिकेतील मातीकामाचे देयक मंजूर करण्याकरिता शेतकऱ्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल (दि.४) आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत पळसगाव उपक्षेत्राचा वनपाल विकास उद्धवराव मेश्राम (५७) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.
तक्रारकर्ता हा शेतकरी असून,जोगीसाखरा येथील रहिवासी आहे. तक्रारकर्त्याने रोपवाटिकेत खोदलेल्या खड्ड्यांजवळ मातीकाम केले होते. त्या कामाचे १ लाख ४० हजार रुपये मिळण्याकरिता त्याने पळसगाव उपक्षेत्र कार्यालयाकडे देयक सादर केले. शिवाय वनपाल विकास मेश्राम याचीही भेट घेतली. परंतु मेश्राम याने तक्रारकर्त्यास् ५० हजार रुपयांची लाच मागितली.
परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार काल या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी वनपाल विकास मेश्राम यास पंचांसमक्ष तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१९) च्या कलम ७ नुसार आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, शिपाई सतीश कत्तीवार, महेश कुकुडकार, तुळशीराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.