खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी :
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या उपक्रमामुळे गोरगरीब जनतेची सेवा घडते. समाजाने अशा उपक्रमांना उचलुन धरले पाहीजे नव्हे तर त्यात सहभाग घेतला पाहीजे. सेवेचा हा यज्ञ असून हा यज्ञ सतत सुरू असावा असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीतर्फे आयोजित रोगनिदान प्रयोगशाळा उदघाटन व रूग्णवाहीका लोकार्पण सोहळयात ‘आश्रय’ बालकाश्रम येथे आज रविवार (22 डिसेंबर) ला उदघाटक म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवा समितीचे अध्यक्ष वसंतराव थोटे तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर सौ. राखी कंचर्लावार, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे व सत्कारमुर्ती म्हणून डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांची उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार म्हणाले, येथील रोगनिदान प्रयोगशाळा अत्यल्प दरात रूग्णांच्या सेवेसाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचा लाभ समाजातील सर्व नागरिकांनी घ्यायला हवा. ही प्रयोगशाळा व्यवस्थीत चालावी म्हणून त्यासाठी आवश्यक असलेली वातानुकुलीत व्यवस्था आपण उपलब्ध करून देवू तसेच सोलार ऊर्जेच्या माध्यमातुन विजेचे बिल आश्रयला भरावे लागणार नाही याची व्यवस्था करू असे त्यांनी सांगीतले. याप्रसंगी आश्रय बालकाश्रम मध्ये उपलब्ध असलेल्या वाचनालयात पाहीजे तितकी पुस्तके उपलब्ध करून तेथील वाचनालय समृध्द करण्याची घोषणा आ. मुनगंटीवार यांनी केली.
यावेळी डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. मुनगंटीवार यांनी सत्काराला उत्तर देताना जनतेने विरंगुळा म्हणून का होईनां रामायण, महाभारत, गीता यासारखे धर्मग्रंथ प्रवासात वाचले पाहीजे त्यामुळे समाजमनावर संस्कार होवून चांगल्या मनाची माणसे तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते रूग्णवाहीचे लोकार्पण व रोगनिदान प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यात आले.
सेवा समितीचे पंकज चिमडयालवार यांनी वैयक्तीक गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल पुरकर यांनी तर संचालन व आभार दिवाकर थोटे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. सचिन वझलवार, शैलेश बागला, आशिष धर्मपूरीवार, पुरूषोत्तम गादेवार सहित अनेक नागरिक उपस्थित होते.