खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील लोणी (ता. कोरपना) येथील शेतकरी विजय रामचंद्र पिंपळशेंडे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे ते मुलीच्या मेंदूच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असून ते या मेंदू आजारावर उपचार करण्यास असमर्थ ठरत आहेत. याबाबतची माहिती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता तातडीने जिल्हा बँकेचे वतीने ६० हजार रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत केली.
सामाजिक बांधिलकी जोपासत बँकेच्या वतीने अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व कठीणप्रसंगी सहकार्य करण्यात बँकेने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासून बँक दरवर्षी होणाऱ्या नफ्याच्या विनीयोगातून 'शेतकरी कल्याण निधी' तयार केला जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्बल घटकांना व शेतकऱ्यांच्या दुर्धर आजाराच्या उपचाराकरिता या कल्याण निधीतून आर्थिक मदत करण्याची सहकारात्मक योजना राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहते. याच निधीअंतर्गत पिंपळशेंडे या शेतकऱ्याच्या मुलीच्या उपचारासाठी बँकेच्या वतीने ६० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
याप्रसंगी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, संचालक चंद्रकांत गोहोकार, पांडुरंग जाधव, संजय तोटावार यांची उपस्थिती होती.