खादी ग्रामोद्योगाला प्रोत्साहन व चालना ही महात्मा गांधीजींना खरी आदरांजली – आ. सुधीर मुनगंटीवार
खबरकट्टा / चंद्रपूर : मूल -
हे वर्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सार्धशतीचे अर्थात 150 व्या जयंतीचे वर्ष आहे. आज सर्वच राजकीय पक्षांच्या भाषणात बेरोजगारी हा मुद्दा असतो. हजारों लोकांना रोजगार देण्याची क्षमता असणारा खादी ग्रामोद्योग हा उपक्रम आहे. हा उपक्रम गांधीजींच्या स्वप्नातला उपक्रम आहे. मी मंत्री असताना माझ्या मंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी दर मंगळवारी खादी परिधान करीत असे. एमएसएमई च्या माध्यमातुन या जिल्हयात रोजगार उपलब्ध होईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिले आहे. गांधीजींच्या स्वप्नातील खादी ग्रामोद्योग व्यवसायाला चालना देणे ही आपली प्राथमिकता असावी, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 27 ऑक्टोबर रोजी मुल येथे नाग विदर्भ चरखा संघाच्या खादी ग्राहक मेळाव्यात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, बाबुराव सोनुलवार, बंडूजी भडके, हेमराज कुंभारे, दादाजी बनकर, राजू गुरनुले, प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर, संजय पाटील मारकवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिका-यांनी आठवडयातुन दोन दिवस खादी परिधान केली तर सुमारे 3 हजार कोटी रू. चा व्यवसाय होईल. यादृष्टीने खादी व ग्रामोद्योग कडे बघण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधींच्या सार्धशतीनिमीत्त खादी व ग्रामोद्योगला प्रोत्साहन देणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. या खादी ग्राहक मेळाव्याला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.