खबरकट्टा / चंद्रपूर :
राजुरा तालुका महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असुन जिल्ह्यातील दारूबंदीमुळे शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत असते आणि त्यात आता पोलिसांचा प्रत्यक्ष सहभाग असुन ही बाब काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ह्या पोलिसांवर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी केली अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे आज चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत महिपाल मडावी आणि राजश्री मडावी यांनी केली.
मडावी यांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीस अधीक्षकांना ह्याची तक्रार करूनसुद्धा ह्या प्रकरणात गुंतलेल्या तिन पैकी केवळ एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली असुन इतर दोघांना मात्र अभय दिल्या गेले असा आरोप करण्यात येत आहे.ह्या प्रकरणात अभय मिळाल्यामुळे दोन पैकी एका पोलीस शिपायाची हिम्मत अधिकच वाढली असुन त्याने राजुरा ठाण्यातील एका महिला पोलीस शिपायाला शारीरिक सुखाची मागणी सुद्धा केल्याची तक्रार देण्यात आली असुनही अजुनपर्यंत ह्या पोलीस शिपायावर कोणती कारवाई करण्यात आली हे अजुनही जाहिर करण्यात आले नाही.
खुद्द राजुरा पोलिस दारू विक्रीसारख्या अवैध धंद्यात गुंतल्यामुळे अवैध व्यावसायिकांना कोणाचीही भीती उरली नसून त्यामुळे तालुक्यात गुन्हेगारी वाढत आहे.पोलीस अधीक्षकांनी मागणी केल्यास सदर पोलिसांविरुद्ध दारूविक्री आणि अवैध व्यवसायात लिप्त असल्याचे पुरावे सादर करण्यास आम्ही तयार आहोत असे महिपाल मडावी आणि राजश्री सय्यद ह्यांनी सांगितले आहे.