बेलोऱ्याचा बच्चू ते नामदार बच्चू (भाऊ) कडू विस्मयचकीत करणारा प्रवास ! #bachhukadu - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बेलोऱ्याचा बच्चू ते नामदार बच्चू (भाऊ) कडू विस्मयचकीत करणारा प्रवास ! #bachhukadu

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :


नुकताच अमरावती जिल्ह्यातल्या अचलपुर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांचा महाराष्ट्राचे मंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यांचा बच्चू ते नामदार बच्चू भाऊ कडू हा प्रवास विस्मयचकीत करणारा, थक्क करणारा आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार या तालुक्यातले बेलोरा हे छोटेसे गाव. 

या गावचं एक सामान्य पोरं समाजकारणात सक्रीय होतं अन बघता बघता महाराष्ट्रासारख्या राज्याचा मंत्री होतं. त्या पोराचा हा प्रवास थक्क करणारा आणि अचंबित करणारा आहे. सगऴं गाव ज्याला बच्चू म्हणून ओऴखायचं तोच बेलोऱ्याचा बच्चू आज महाराष्ट्राचा मंत्री झालाय. बेलोर्याचा बच्चू ते राज्याचा मंत्री नामदार बच्चू भाऊ कडू हा प्रवास जबरदस्त आहेच पण कमालीचा प्रेरणादायी आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. एका मतदारसंघातल्या आमदाराचे नाव दुसर्या मतदारसंघात माहित नसते. अनेक बहाद्दर पुर्ण मतदारसंघात परिचीत नसतात. पण बच्चू कडू हे नाव चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांचे खरे नाव ओमप्रकाश. जन्मजातच स्वयंप्रकाशी असलेला हा बच्चू गौतम बुध्दांच्या अप दिप भव: या सुत्राप्रमाणे स्वत:च प्रकाशमान होत होता. दुसर्या कुणाच्या प्रकाशात चमकण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर चमकत होता. ओमप्रकाश आईचा खुप लाडका. जणू काऴजाचा तुकडाच. आईने या काऴजाच्या तुकड्याचे लाडाने बच्चू नाव ठेवले. 


बघता बघता त्या आईचा हा लाडका बच्चू उभ्या बेलोरा गावाचा लाडका बच्चू झाला. पुढे जावून तो अवघ्या तालुक्याचा बच्चू झाला. गेल्या दहा-पंधरा वर्षात तो महाराष्ट्राला परिचीत असलेला, महाराष्ट्राच्या काऴजात घर केलेला आमदार बच्चू भाऊ कडू झाला. आज तोच बच्चू महाराष्ट्राचा नामदार होतोय, मंत्री होतोय. आईच्या काऴजात घर केलेल्या या बच्चूने बघता बघता अवघ्या महाराष्ट्राच्या काऴजात घर केले आहे. बच्चू कडूंच्या मंत्रीपदाने अवघा महाराष्ट्र, शेतकरी, कष्टकरी, अंध-अपंग लोक सुखावले आहेत. त्यांच्या मनाला सुकून मिऴाला आहे. बच्चू कडूंच्या रूपाने लोकांच्या मनातला मंत्री झालाय. 


     
कबड्डी खेऴता खेऴता बरोबरच्या एका मित्राला रक्ताची उलटी होते अन त्याला मुंबईला दवाखान्यात नेले जाते. बच्चू त्या मित्राला मुंबईला उपचारासाठी दवाखान्यात घेवून जातो. मित्राला रक्ताची गरज होती पण वजन कमी भरत असल्याने डॉक्टर रक्त घेत नव्हते. दिलदार, जिगरबाज व डोकेबाज बच्चू मित्राला वाचवण्यासाठी कासाविस झालेला असतो. वजन कमी आहे म्हणून पोटभर पाणी पितो, पँन्टच्या दोन्ही खिशात दगड ठेवून वजन करतो आणि रक्तदान करतो. मित्राला वाचवून गावी घेवून आलेल्या बच्चूच्या स्वागतासाठी अख्खा बेलोरा गाव येतो. 

पाहता पाहता बच्चू अख्ख्या गावाचा लाडका होतो. गावात कुणाला अडचण यावी अन ती बच्चूपर्यंत पोहोचावी. बच्चू त्यासाठी मदत करायला तत्परच असे. बच्चू गावातले पेशंट घेवून मुबंईला जात असे. तिथे त्यांच्यावर उपचार करत असे. हऴू हऴू हे काम तालुकाभर पसरत होते. गोर-गरिब पेशंट हक्काने बच्चूकडे यायचे. बच्चू त्यांना मुबंईला घेवून यायचा. त्यांच्यावर मोफत उपचार करायचा. सोबतच्या माणसांना पुरणपोऴी जेवू घालायचा. लोकांचे डोऴे भरून यायचे. काऴीज भरून यायचे. परस्थितीने गांजलेल्या लोकांना बच्चू देवदूत नव्हे तर देवच वाटायचा. अनेकवेऴा रेल्वे तिकीटाला पैसे नसल्याने टिसी पकडायचा, त्रास द्यायचा पण सेवेचा प्रवास थांबला नाही. 

अनेक अडथऴ्यांची शर्यंत पार करत तो अविरत चालूच राहिला.  बेलोरा गावातल्या यात्रेत खुलेआम वेश्या व्यवसाय चालायचा. गावातली तरूण पोरं बरबाद व्हायची. व्यसनांच्या आहारी जायची. संवेदनशिल मनाच्या बच्चूला ते खटकायचे. बच्चू अस्वस्थ व्हायचा. त्या अस्वस्थ बच्चूनेच नववीत असताना त्या यात्रेतल्या या प्रकाराविरूध्द एल्गार पुकारला आणि तो बंद पाडला. 

लोकांनी या देवदूताला पंचायत समितीच्या निवडणूकीला उभे केले. प्रचार करत असताना हा बच्चू एका म्हातारीच्या घरी मत मागण्यास गेला असता म्हातारीने शिव्या दिल्या. मी तुला का मत देवू ? तु माझ्यासाठी काय केलेस ? असा प्रश्न विचारत शिव्या घातल्या. मला दिसत नाही, माझ्या डोऴ्यांचे ऑपरेशन करायचे आहे तु करतोस का ? मग तुला मत देते असे खुले आव्हानच दिले. लोकांच्या सेवेसाठी जीव ओवाऴून टाकणार्या बच्चूने निवडणूक तिथेच सोडली, प्रचार तिथेच सोडला. मतदान पाच-सहा दिवसावर येवून ठेपले होते, प्रचार रंगात आला होता पण निवडणूकीची, जय-पराजयाची तमा न करता या बहाद्दराने म्हातारीला घेवून मुंबई गाठली. तिच्या डोऴ्यांचे ऑपरेशन केले. बच्चूने म्हातारीसाठी निवडणूक पणाला लावली पण इकडे या घटनेची माहिती वार्यासारखी पसरली. 

लोकांनी बच्चूला निवडूण दिले. मतदारसंघात प्रचार करायला नसतानाही लोकांनी भरघोस मतांनी निवडूण दिले. बेलोर्याचा बच्चू चांदूरबाजार पंचायत समितीचा सभापती झाला. स्वत:चे लग्न लावायची वेऴ आली तेव्हा हातात तिरंगा घेवून व बायकोला तिरंगा देवून लग्न करणार्या या पठ्ठ्याने स्वत:च्या लग्नात कर्ज काढून अपंगाना सायकली वाटल्या. वरात, घोडा, वाजंत्री असला रूबाब न दाखवता अपंग बांधवांना लग्नासाठी निमंत्रीत केले. त्यांना आदराने व प्रेमाने जेवू घातले. या लाडक्या बच्चूवर लोकांनी आतोनात प्रेम केले. कुणी मंगऴसुत्र मोडले, कुणी अंगठी मोडली, कुणी बोरमाऴ मोडली आणि या माणसाला निवडणूकीला पैसे दिले. 


बेलोरा गावचा बच्चू पुढे अचलपुर मतदारसंघाचा आमदार झाला. पहिल्यांदा खासदारकीला उभा राहिला पण पाच-सहा हजार मतांनी पराभव झाला. हातात पैसा नसताना, कसलाही राजकीय वारसा नसताना हा माणूस सेवेच्या बऴावर आमदार झाला. अपक्ष म्हणून सलग चौथ्यांदा निवडूण आला. गेली पंधरा वर्षे ते सलग आमदार आहेत. बच्चू कडूंच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत. अशा कैक प्रसंगाचे मोती त्यांच्या जीवनप्रवासात विखुरलेले आहेत. कोणता मोती उचलावा अन कोणता ठेवावा अशी अवस्था त्यांचा जीवनप्रवास अभ्यासताना होते.


       
बच्चू भाऊ कडूंचा हा जीवन प्रवास दिपस्तंभारखा आहे. त्यांनी आजवर शंभरपेक्षा जास्तवेऴा रक्तदान केले आहे. अपंग बांधवांसाठी त्यांनी जे काम केलय त्याला तोडच नाही. अपंगांचे दु:ख काय असते हे दाखवून देण्यासाठी स्वत:चा हात व पाय बांधून आंदोलन केले. शासकीय संपत्तीचे नुकसान न करणारी पण लक्षवेधी आणि प्रभावी अनेक आंदोलणे केली. अपंगांसाठी संघर्ष करून, आंदोलन करून आजवर तब्बल अडतीस जीआर त्यांनी मंजूर करून घेतले आहेत. 


आज त्यांना अंध-अपंगांचा मसिहा म्हणून पाहिले जाते. अनेक अपंगांच्या देव्हार्यात त्यांची चप्पल ठेवून पुजली जाते. असा सन्मान मिऴवणारा नेता आजच्या घडीला सापडणे मुष्कीलच आहे. लोकशाहीत लोक मालक असतात. नेते व अधिकारी लोकांचे नोकर असतात. हे सुत्र लक्षात ठेवत ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, तहसिलदार ते प्रांतापर्यंत सर्व अधिकार्यांना घेवून गावोगाव प्रहारची राहूटी सुरू केली. लोकांना रेशनिंग कार्ड, जातीचा दाखला, उतारे पंधरा मिनिटात त्यांच्या गावातच दिले. 


महिना महिना हेलपाटे मारून जी कागदपत्रे मिऴत नव्हती ती कागदपत्रे अवघ्या पंधरा मिनिटात आपल्याच गावात लोकांना मिऴू लागली. लोकांना लोकशाहीचा अर्थ समजू लागला. लोक ताकदीने बच्चू कडूंच्या मागे उभे राहू लागले. या डोंगरासारख्या कामाच्या जोरावर हा माणूस सलग चारवेऴा निवडूण आलाय. त्यांनी दोन वर्षापुर्वी प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन केलाय. त्यांचा पक्ष राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. गावोगाव विस्तारतो आहे. नायक चित्रपटातला अनिल कपूर लोकांना खुप भावला. तो एक दिवसाचा मुख्यमंत्री लोकांनी डोक्यावर घेतला. 

बच्चू कडू हे वास्तवातले नायक आहेत. वास्तवातला हा नायकही लोकांनी डोक्यावर घेतलाय. थेट जनतेतून मुख्यमंत्रीपदाची निवडणूक झाली तर बच्चू कडूंना कोणी आव्हान देवू शकणार नाही. कारण ते लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. आज ते मंत्री झालेत. येणाऱ्या  काऴात मुख्यमंत्रीही होतील. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी लोकभावना आहे. बेलोऱ्याचा बच्चू आज मंत्री झालाय. तो भविष्यात नक्कीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही होईल यात शंका वाटत नाही. 


बच्चू ते नामदार बच्चू भाऊ कडू हा त्यांचा प्रवास एक मापदंड आहे. आज या बच्चूला जन्म देणार्या आईचे डोऴे आनंदाने पाणावले असतील. त्यांना जन्म देणार्याच नव्हे तर त्यांच्यावर आईसारखे प्रेम करणार्या हजारो आयाचे डोऴे आनंदाने भरून आले असतील. कारण त्यांचा बच्चू आज महाराष्ट्राचा मंत्री झालाय.