खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या जिवती तालुक्यातील पिट्टिगुडा येथील खेमाजी नाईक आश्रम शाळेच्या अधीक्षकांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ डिसेंबर रोजी घडली असून सुभाष पवार वय ४२ असे आत्महत्याग्रस्ताचे नाव आहे.संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला असून सापडलेल्या सहा पानी चिठ्ठीत देखील मृतकाने याचा उल्लेख केल्याचे बोलले जात आहे.
या संस्थेत संस्थाचालकाचे जावईच हेडमास्तर असून यापूर्वी देखील एका शिक्षकाला त्यांनी मारहाण केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मृत सुभाष पवार हे मूळ जिवती तालुक्यातील धोंडा अर्जुनी गावाचे मुळनिवासी आहे.पिटीगुडा खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळेत ते कार्यरत होते.
काल दिनांक २५ डिसेंबर पहाटेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात असून आत्महत्येपुर्वी त्यांनी लिहिलेल्या सहा पानी चिठ्ठीत संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्या मनमानी कारभार व जाचाला कंटाळून तसेच सतत होणार्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्याचे कळते.शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले.
सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून जिवती तालुक्यात तणावपूर्ण वातावरण पहायला मिळत आहे.तर वृत्त कळताच मृतकाच्या नातेवाईक व गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला सुद्धा मारहाण केली त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संस्था चालकाची राजकीय वर्तुळात चांगलीच ओळख असून यामुळे सदर प्रकरण दाबले तर जाणार नाही ना !याविषयी अनेक शंकांना उधाण आले असून मृतकाच्या परिवाराला न्याय मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.