फेम इंडिया तर्फे सुधीर मुनगंटीवार यांना सर्वश्रेष्‍ठ मंत्री हा पुरस्‍कार नवी दिल्‍लीत प्रदान : या पुरस्‍काराने समाजसेवेची नवी ऊर्जा मिळाली - सुधीर मुनगंटीवार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

फेम इंडिया तर्फे सुधीर मुनगंटीवार यांना सर्वश्रेष्‍ठ मंत्री हा पुरस्‍कार नवी दिल्‍लीत प्रदान : या पुरस्‍काराने समाजसेवेची नवी ऊर्जा मिळाली - सुधीर मुनगंटीवार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

कोणताही पुरस्‍कार हा त्‍या क्षेत्रात काम करण्‍यासाठी ऊर्जा प्रदान करण्‍याचे माध्‍यम असते. आजचा पुरस्‍कार माझ्यासाठी आनंददायी, प्रेरणादायी व समाजाची सेवा करण्‍यासाठी नवी ऊर्जा बहाल करणारा असल्‍याचे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सर्वश्रेष्‍ठ मंत्री हा पुरस्‍कार प्रदान केल्‍याबद्दल फेम इंडिया परिवाराचे आभार त्‍यांनी व्‍यक्‍त केले.


आज नवी दिल्‍लीतील विज्ञान भवनात फेम इंडिया या नियतकालीकातर्फे सर्वश्रेष्‍ठ मंत्री या पुरस्‍काराने सुधीर मुनगंटीवार यांना गौरविण्‍यात आले. यावेळी मंचावर भारत सरकारचे कौशल्‍य विकास मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, एशियन ग्रुप चे संस्‍थापक एएएफटी विद्यापीठाचे कुलपती संदीप मारवा, फेम इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यु.एस. सौंथालिया, द फ्रंटचे संस्‍थापक राणा यशवंत, अहमदाबाद चे खासदार डॉ. किरीट सोलंकी, पंजाब केसरी या वृत्‍तपत्राचे संपादक किरण चोप्रा, राजस्‍थानचे माजी खासदार साबीर अली  आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सुधीर मुनगंटीवार यांना सर्वश्रेष्‍ठ मंत्री या पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले. 

फेम इंडिया नियतकालीकाने एशिया पोस्‍ट या सर्व्‍हे एजन्‍सीच्‍या मदतीने सर्वश्रेष्‍ठ मंत्री 2019 या गौरवासाठी एक सर्व्‍हे केला. व्‍यक्‍तीमत्‍व, प्रतिमा,कार्यक्षमता, प्रभाव, मंत्रालयीन विभागाच्‍या कामाकाजाची जाण, लोकप्रियता, दुरदृष्‍टी, कार्यशैली आणि परिणाम या सात मुद्दयांच्‍या अनुषंगाने देशातील सर्व राज्‍यांच्‍या मंत्र्यांचा 21 विविध कॅटेगिरीमध्‍ये अभ्‍यास केला. यात देशातील सर्वश्रेष्‍ठ अनुभवी मंत्री या श्रेणीत महाराष्‍ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्‍यात आली.महाराष्‍ट्राचे अर्थ, नियोजन आणि वने आणि विशेष सहाय्य या विभागांच्‍या मंत्री पदाची धुरा सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्‍या 5 वर्षात आपल्‍या कार्यकर्तृत्‍वाचा ठसा जनमानसात उमटविला आहे. अर्थमंत्री म्‍हणून महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक विकासात त्‍यांनी महत्‍वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्‍ट्राच्‍या विकासाला नवी दिशा देणारे पाच लोककल्‍याणकारी अर्थसंकल्‍प त्‍यांनी सादर केले आहे. हरित महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबविण्‍यासाठी त्‍यांनी 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला. या निर्धाराची पूर्तता करण्‍यासाठी त्‍यांच्‍या नेतृत्‍वात वनविभागाने विक्रमी वृक्ष लागवड केली. लिम्‍का बुक ऑफ रेकार्डने या विक्रमाची नोंद घेतली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्‍दा ‘मन की बात’ या कार्यक्रमात या वृक्ष लागवड मोहीमेचे कौतुक केले. यावर्षी तीन महिन्‍यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्‍याची मोहीम त्‍यांच्‍या नेतृत्‍वात राज्‍यभर राबविण्‍यात आली आहे व ती यशस्‍वी सुध्‍दा ठरली आहे. महाराष्‍ट्राच्‍या लक्षणीय आर्थिक प्रगतीसाठी इंडिया टूडे तर्फे समूहातर्फे त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले आहे. द व्‍हॉईस या वृत्‍तसंस्‍थेतर्फे बेस्‍ट परफॉर्मींग मिनीस्‍टर म्‍हणून त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले आहे. विक्रमी वृक्ष लागवड मोहीमेसाठी त्‍यांना विविध प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले आहे. फेम इंडिया नियतकालीकातर्फे देशातील सर्वश्रेष्‍ठ मंत्री म्‍हणून त्‍यांची झालेली निवड त्‍यांच्‍या कार्यकर्तृत्‍वाचा गौरव करणारी आहे.