राखी कंचर्लावार -महापौर, राहुल पावडे - उपमहापौर तर रवी आसवानी -स्थायी सभापती यांच्या हाती चंद्रपूर महानगर पालिकेची धुरा? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राखी कंचर्लावार -महापौर, राहुल पावडे - उपमहापौर तर रवी आसवानी -स्थायी सभापती यांच्या हाती चंद्रपूर महानगर पालिकेची धुरा?

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :गोमती पाचभाई -संस्थापक /मुख्य संपादक )चंद्रपूर महानगर पालिकेच्या विद्यमान महापौर अंजली घोटेकर व उपमहापौर अनिल फुलझेले यांचा अडीच वर्षीय कार्यकाळ 30ऑक्टोबर ला पूर्ण झालेला असून,  विधानसभा निवडणूकीमुळे त्यांना 21नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. 13 नोव्हेंबर ला पुढच्या अडीच वर्षीय  महापौर कार्यकाळाकरिता सर्वसाधारण महिला (ओपन -महिला ) असे आरक्षण निघाले असून, 22 नोव्हेंबर ला महापौर निवडीची निवडणूक होणार आहे.सद्यस्थिती 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीनुसार  भाजप - 37, काँग्रेस - 13,बसप -6,राष्ट्रवादी -2,शिवसेना- 2,मनसे -2,अपक्ष -4 अश्या पक्षीय बलाबलात एकूण  66 पैकी 37 असे  भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे.
निवडणुकीला अवघ्या काही दिवसांचाच अवधी असल्याने शहरात राजकीय हालचालींचा वेग वाढला असून आज मावळत्या महापौर सौ.अंजली घोटेकर यांनी सर्व पक्षीय नगरसेवकांसोबत फोटो सेशन उरकून घेतले असून इथून पुढे स्पष्ट बहुमत असून सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवरून पक्षातील नाराज गटात सुद्धा कोणतीही फोडाफोडी होऊ नये याची खबरदारी घेत नगरसेवकांना सहलीला पाठविणार असल्याचे त्यांच्या भाष्यावरून कळते.

स्पष्ट बहुमत असतानाही भाजपनं सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. आम्हाला कुठलीही भीती नसून नगरसेवकांची इच्छा असल्यास त्यांना सहलीवर पाठवू, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.

चंद्रपूर महानगर पालिका अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत 3 वेळा महापौर म्हणून महिलांनाच संधी मिळाल्याने भाजपातील  अनेक इच्छुक नगरसेवक या खेपेला आरक्षणाकडे मोठी आस लावून बसले असलेले तरीही सलग चौथ्यांदा महिलाआरक्षण निघाल्याने या नगरसेवकांनी आता उपमहापौर पदाकडे मोर्चा वळविला असून भाजपमध्ये महापौर सोबतच उपमहापौर पदाकरितासुद्धा यावेळेस मोठी रस्सीखेच आहे. 

महापौर पदाकरिता वंदना तिखे, अनुराधा हजारे, राखी कंचर्लावार,आशा आबोजवार, सविता कांबळे यांची नावं चर्चेत असून अबोजवार ह्या भैय्याच्या खंद्या समर्थक असून त्यासुद्धा  हंसराज अहिर यांच्यामार्फत जोरदार फिल्डिंग लावत असून काल झालेल्या ट्रायस्टार येथील बैठकीत भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सुधीर मुनगंटीवार यांना महापौर निवडीचे सर्वाधिकार दिल्याने आता भाऊंचे समर्थकच महानगरपालिकेचे भावी पदाधिकारी असतील अशी पूर्ण शक्यता आहे.
अर्थातच या निवडीत कोणतीही फूट न पडता भाजपाची महापौर सहज बसेल,तरीही अश्या राजकीय परीस्थितीत गेल्या अडीच वर्षांपासून नाराज असलेल्या "गोल्डन गँग" संबोधित नगरसेवकांची नाराजी-मर्जी सांभाळत समतोल पदाधिकाऱ्यांची निवडीची  जबाबदारी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आली आहे.दरम्यान, इच्छुकांनी आपापल्या परीने भाऊंकडे फिल्डिंग लावली असून यात अनेक नाराज नगरसेवकांची सुद्धा राखी कंचर्लावार यांच्या नावावर सहमती असली तरीही महानगर पालिकेत कायम भाऊंचा आशीर्वाद प्राप्त असलेले राहुल पावडे हे नगरसेविका  सविता कांबळे यांच्या नावावर आग्रही असून स्वतः उपमहापौर पदी विराजमान होण्यास इच्छुक असल्याचे चर्चिर्ले जात आहे. 

तरीही राखी कंचर्लावार यांनाच महापौर पद दिले जाण्याची पूर्ण शक्यता असून उपमहापौर पदाची माळ राहुल पावडे यांच्या गळ्यात पडल्यास स्थायी समिती पदी नगरसेवक रवी आसवानीतर गटनेते पदी वसंता  देशमुख कायम असतील असे समीकरण असण्याची पूर्ण शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून कळते.