आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री? : विजयी अभिनंदन बॅनर उल्लेख - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री? : विजयी अभिनंदन बॅनर उल्लेख

Share This
 खबरकट्टा / महाराष्ट्र :
वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. या विजयानंतर शिवसेनेनं सत्तेत समसमान वाटा पाहिजे, अशी भूमिका घेतली असतानाच, आता आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 


आदित्य यांच्या विजयानंतर त्यांच्या वरळी मतदारसंघात त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले असून, 'महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सत्तेत समान वाटा दिला तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या रुपानं ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीसारख्या सुरक्षित मतदारसंघातून शिवसेनेनं त्यांना आखाड्यात उतरवलं होतं. आदित्य निवडणूक लढवत असल्यानं ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती. 
आदित्य ठाकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुरेश माने निवडणूक लढवत होते. ही निवडणूक आदित्य ठाकरे सहज जिंकतील. मात्र, किती मतांच्या फरकानं त्यांना विजय मिळणार याची उत्सुकता होती. त्यात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले मैदानात उतरल्यानं उत्सुकता आणखी ताणली गेली होती. वरळी मतदारसंघाचा अपेक्षित निकाल लागला. 


आदित्य ठाकरे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असून, त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माने यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर पहिलीच निवडणूक जिंकल्याचा आनंद आदित्य यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. मला फक्त काम करण्याची संधी हवी होती. ती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली होती. 


दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्तेत समान वाटा हवा असल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यानुसार भाजप-शिवसेना महायुतीत ठरल्याप्रमाणेच सगळं होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे. त्यामुळं आता शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद दिलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.


शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चेला जोर आला असतानाच, आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करणारे बॅनर त्यांच्या मतदारसंघात झळकले आहेत. विशेष म्हणजे आदित्य यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे. 


'शिवसेनेचे युवा नेते आणि भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल अभिनंदन' असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळं आगामी काळात मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे आदित्य ठाकरे शपथ घेतील का, अशी उत्सुकता लागली आहे.