वडेट्टीवार येणार गोत्यात : धनुष्यबाणाने मारला तीर, झाडू करतोय सफाई; पंजा थरथरला - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वडेट्टीवार येणार गोत्यात : धनुष्यबाणाने मारला तीर, झाडू करतोय सफाई; पंजा थरथरला

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र -निर्वाचन क्षेत्र 73 ब्रम्हपुरी विधानसभा, काँग्रेसचे हेवीवेट लीडर विजय वडेट्टीवार निवडणूक लढविणार असलेल्या  क्षेत्रातून उमेदवार उभा करण्यास भाजप अपयशी ठरला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी शिवबंधन बांधून एबी फॉर्म आणण्यात यशस्वी ठरले. याच मतदार संघातून अॅड. पारोमिता गोस्वामी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवीत असल्याने पंजाची पाचही बोटे थरथरत आहेत. नामनिर्देशन पत्रे सादर करण्यासाठी तिघांनीही शक्तीप्रदर्शन केले. भाजप सेना युतीचे उमेदवार संदीप गड्डमवार यांनी प्रचंड जणसमुदायाच्या गर्दीने धनुष्यबाणाने तीर  मारला, तर काँग्रेसचे उमेदवार  विजय वडेट्टीवार यांनीही बैलगाडीवरून येऊन आव्हान स्वीकारले. त्यातच  आम आदमी पक्षाच्या  अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी पहिल्या राजकीय प्रवेशाची सुरवात दणक्यात केली. गोस्वामी यांनी काढलेली संकल्प रॅली ब्रम्हपुरीकरांसाठी आगळीवेगळी ठरली. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय वडेट्टीवार हे सध्या ब्रम्हपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. ते पुन्हा याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे प्रा.अतुल देशकर, वसंत वारजूरकर, कृष्णा सहारे इत्यादी उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छूक होते. तशी तयारीही त्यांनी केली. मात्र, युतीच्या राजकारणात वेगळेच घडले. ब्रम्हपुरी मतदारसंघ शिवसेनेला गेला. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून पहिल्यांदाच 1990 मध्ये नामदेव दोनाडकर शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यानंतर दोनाडकर हे छगन भुजबळ यांच्यासमवेत काँग्रेसवासी झाले आणि पुढे 1995 पासून हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यावेळी भाजपचे उमेदवार वासुदेव पाथोडे यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हा सुरेश उर्फ बाबासाहेब खानोरकर हे जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, याच निवडणुकीपासून पाय पसरत भाजपने 1999 (उद्धवराव शिंगाडे), 2004 व 2009(दोन्ही वेळा प्रा.अतुल देशकर) अशा सलग तीन वेळा विजय मिळवला. 

परंतु २०१४ मध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी भाजपला धूळ चारत तब्बल ३० वर्षांनंतर काँग्रेसला प्रतिनिधीत्व मिळवून दिले. विजय वडेट्टीवार यांची ताकद लक्षात घेता भाजपने ब्रम्हपुरी मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पारोमिता गोस्वामीना फायदा व्हावा, म्हणून भाजपने उमेदवार दिला नाही, हि शक्यताही नाकारता येत नाही. गड्डमवार आणि गोस्वामी यांनी वडेट्टीवार यांचे राजकारण संपविण्यासाठी कंबर कसली आहे. 

सेनेला जागा गेल्याने अनेक भाजप कार्यकर्ते नाराजीचा सूर आवळत असून, राजीनामे देत असल्याचे व्हिडीओ वायरल करीत आहेत. हे नाराज वडेट्टीवार यांच्याकडेही जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच अशाच काही जणांनी पारोमिता गोस्वामींची भेट घेतल्याची माहिती आहे. वडेट्टीवार विरोधक गट हा गड्डमवारसाठी सक्रिय झाला आहे. अशातच माजी खासदार नरेश पुगलिया हे देखील या मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. ती खरीही होती. प्रचारासाठी त्यांनीही मोठे निवासस्थान देखील भाड्याने घेतले होते. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. पुगलिया हे वडेट्टीवार व गड्डमवार यांचे कट्टर विरोधक आहेत. या भागातील जुने काँग्रेस कार्यकर्ते पुगलिया यांच्या शब्दाबाहेर जात नाहीत. मग, हे पुगलिया समर्थक पारोमिताच्या सोबतीला जाऊ शकतात. वडेट्टीवार व गड्डमवार नको असलेले काही भाजप आणि शिवसेना पदाधिकारीही काहीतरी वेगळी भूमिका घेणार असल्याची चर्चा आतल्या गोटात सुरु आहे. तरीही सेनेला जागा गेल्यास भाजपाची कुठलीही मदत होणार नाहीच म्हणून आपला विजय पक्का अश्या भ्रमात असतानाच अचानक महायुतीधर्म पाळण्यास सज्ज झालेली वरिष्ठ भाजपा मांडली व त्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी -भाजपा -सेना कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाने खऱ्या अर्थाने विजयाची बोटे थरारली आहेत. 

ब्रह्मपुरी मतदारसंघातून 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले होते. यातील पाच जणांचे नामांकन रद्द झाले.यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून विजय वडेट्टीवार, भाजप- शिवसेनेकडून संदीप गड्डमवार, आम आदमी पार्टीकडून ॲड. पारोमिता गोस्वामी, बहुजन वंचित आघाडी कडून चंद्रलाल मेश्राम, भारतीय जनता पार्टीकडून दिलीप शिवरकर, अपक्ष म्हणून वसंत वाजुरकर, प्रणव सोमनकर, विश्वनाथ श्रीरामे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यानंतर वारजूकर, शिवरकर यांच्यासह तिघांनी नामांकन मागे घेतल्याने 11 जण रिंगणात आहेत.