वन्यप्राण्यांची शिकार करनाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील नऊ आरोपी बिबट्याच्या कातडीसहित रंगेहात जेरबंद - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वन्यप्राण्यांची शिकार करनाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील नऊ आरोपी बिबट्याच्या कातडीसहित रंगेहात जेरबंद

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरुन राजुरा येथील वनविभागाच्या भरारी पथकाने अखेर वन्यप्राण्यांची शिकार करणा-या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. गुप्तता पाळून सतत या गुन्हेगारांचा पाठपुरावा केल्यानंतर बिबटचे कातडे आणि शिकारीच्या साधनांसह सर्व नऊ आरोपींना महाराष्ट्र व तेलंगणातून वन कायद्यानुसार अटक केली आहे.

राजुरा येथील वन विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी कोरपना तालुक्यातील कुसळ येथील जगदीश लिंगु जुमनाके याचे घरी छापा मारला असता बिबट या प्राण्याचे चामडे आढळून आले. या प्रकरणाची माहिती घेतांना हा बिबट तेलंगाणातील आसिफाबाद जिल्हयातील वाकडी तालुक्यातील जंगलात मारुन त्याचे चामडे येथे विक्रीसाठी आणण्यात आले होते. परंतू विक्री होण्यापुर्वीच वन अधिका-यांनी या प्रकरणाचा छडा लावला.यानंतर वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली तेलंगाणातील वाकडी तालुक्यातील पेवटा व चिचपल्ली गावातून प्रत्येकी तिन आरोपी, बंबारा गावातून एक आणि कोरपना तालुक्यातील कुसळ व चिंचोली येथून प्रत्येकी एक आरोपी अशा एकुण नऊ आरोपींना शिताफीने अटक केली. यात बिबट ला मारणारा मुख्य आरोपी बारीकराव यशवंत आत्राम याला पेवटा येथून ताब्यात घेतले. 

या आरोपींकडून बिबट्या वाघ मारण्यासाठी वापरलेला लोखंडी साफळा, त्याचे दात, नख, मिशा व इतर अवयव हस्तगत केले. हा लोखंडी साफळा बनवून देणा-या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. या सर्व नऊ आरोपींवर अपराध क्रमांक ११ अन्वये वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३४, ४४, ४८ए, ४९ बी, ५०, ५१, व ५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चंद्रपूर न्यायालयाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. आक्टोंबर महिण्यात तब्बल पंचविस दिवस चाललेल्या या मोहिमेत तेलंगाणातील वनअधिकारी व पोलिस अधिकारी यांनी चांगले सहकार्य केले.ही कारवाई वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक पी.जी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात राजुरा संरक्षण पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी फनिंद्र गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन. बासनवार, गजानन इंगळे, विदेशकुमार गलगट, वनपाल विकास शिंदे, जी. बी.जाधव, वनरक्षक ओंकार थेरे, बंडू पेंदोर,एस.व्ही. सावसाकडे,,उमेश जंगम, नरगेवार, पुल्लेवाड व पोलिस काँन्टेबल अलीजान मो.आलम यांनी केली. तेलंगाणातील वाकडीचे पोलीस निरीक्षक राणा प्रताप, उपनिरीक्षक चंद्रशेखर, उध्दव मुडे, आसिफाबादचे वन अधिकारी अप्पलकोंडा व श्रीनिवास रेड्डी यांनी सहकार्य केले.