राजुरा विधानसभा : चौरंगी लढतीचा कोन ठरेलं बाजीगर? काँग्रेस बंडखोर ठरणार खरा जायंट किलर? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा विधानसभा : चौरंगी लढतीचा कोन ठरेलं बाजीगर? काँग्रेस बंडखोर ठरणार खरा जायंट किलर?

Share This
खबरकट्टा / राजकीय विश्लेषण : राजुरा विधानसभा -

उद्या 21ऑक्टोबर 2019ला राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानाच्या प्रचार तोफा थंडाऊन बाहेरील वातावरणातील प्रचार कलकलाट शांत झाला असला तरीही निवडणुकीतील सर्वात महत्वाचा घटक "मतदार"हा संभ्रम स्थितीत आढळून येत असून कौल कुणाच्या पारड्यात पडेल हे 24ऑक्टोबर ला स्पष्ट होईलच.

अवघ्या 24तासावर मतदान बाकी असताना क्षेत्रातील चौरंगी लढतीच्या चित्रामुळे मुख्य उमेदवार व कार्यकर्ते सुद्धा संभ्रम स्थितीत असून काँग्रेस बंडखोर, गोंडवाना व बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराने उर्वरित तिन्ही मातब्बर  उमेदवारांना घाम मात्र सोडला आहे.सद्यस्थिती संपूर्ण विधानसभा क्षेत्रात नजर फिरवल्यास कुठे काँग्रेस, कुठे भाजपा तर काही ठिकाणी संघटनेची चर्चा जरी असला तरी गोंडवाना वंचित उमेदवाराचे नाव चारही तालुक्यात आदिवासी, वंचित बहुजनांच्या ओठी असून गेल्या सहा महिन्यात आदिवासी समाजासंबंधात क्षेत्रात घडलेल्या घडामोडींमुळे कधी नव्हे तो आदिवासी समाज तन-मन-धनाने एकवटलेला बघावयास मिळत आहे.राजुरा निर्वाचन क्षेत्रात 1लाखाच्या वर मतदान संख्या असलेल्या या गोंडवाना समाजाला आता वंचित बहुजनांची साथ लाभल्याने गेल्या 15दिवस चाललेल्या प्रचार रणधुमाळीत गोदरु जुमनाके यांच्या प्रचार सभेत कोणताही स्टार प्रचारक नसताना राजुरा, जिवती, कोरपना या तिन्ही तालुक्यात जमलेली 4-5हजारावर गर्दी सर्वांच्या नजरा वेधणारी होती.त्याचबरोबर गोंडपिपरी तालुक्यातील 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या बहुतांशी मिनी माडा ग्रामपंचायतीत मतदारापर्यंत पोहोचण्यात काही अंशी गोदरु जुमनाके अपयशी ठरले असले तरीही वंचितांची असलेली साथ या मतदारांना,  लोकसभेत कोणताही प्रचार गाजावाजा न करतानाही लक्षणीय मतदान संख्या नोंदवणिनारा हा मतदार उठावाचा इन्फ्लुएन्सर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवाय काँग्रेस चा पुगलिया गट सुद्धा सर्व यथाशक्तीने आरी चा प्रचार करीत असून क्षेत्रातील काँग्रेस चे मातब्बर दिवंगत नेते प्रभाकर मामूलकर यांचे नातेवाईक सुद्धा  "हाथ" सोडून  "आरी" चालवीत असून या सर्व समीकरणाने काँग्रेस ला प्रचंड खिंडार पडण्याची दाट शक्यता आहे. नेमके हेच मुख्य उमेदवारांनी दुर्लक्षित केलेले समीकरण "जायंट किलर" ठरणार यावर मतदानपूर्वच राजकीय समीक्षकांचे दुमत आढळत नाही.

आघाडीत पुन्हा एकदा सरशी करत काँग्रेस चे उमेदवार सुभाष धोटे अनेक वादविवादानंतर तिकीट ओढून आणण्यात यशस्वी जरी झाले असले तरीही संपूर्ण प्रचार कार्यक्रमात काही वैयक्तिक घडामोळींमुळे त्यांना विंनिंग आत्मविश्वास दाखविता आला नसल्याची चर्चा प्रचार तोफा थंडावल्यानंतर काँग्रेसच्याच मातब्बर कार्यकर्त्यात आहे.

या सर्व प्रकाराला सायलेंट प्रचार, आतून प्रचार, 48तास पूर्व भक्कम प्रचार, अदृश्य हाताचा प्रचार अशी कित्येक नाव देऊन "पक्ष कॅडर"मतदारांना धरून ठेवण्याचा काँग्रेस चा प्रयत्न कितपत यशस्वी ठरेलं हे भविष्यात स्पष्ट होईलच. परंतु अंतर्गत बंडाळी, घराणेशाहीवरुन युवा कार्यकर्त्यांत क्षणिक न दिसणारी तरीही भविष्यातील आपल्या राजकीय चढत्या क्रमाबद्दल निर्माण झालेली शंका व मनाचा घालमेल आता मतदारांचा मेळ टिकविणार की अदृश्य हातांच्या बोटांना दुसरं कोणतं बटण दाबायला सांगणार यावर सुद्धा साशंक आहे.शिवाय काँग्रेस च्या एकमेव खासदारांच्या प्रचार भाषणातील "कुण्याही इतर कुणबी उमेदवारांशी वैर नसल्याचे" वक्तव्य सुद्धा जातीय मतदारांना विचारात पाडणारे आहे.2014च्या निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळविणारे भाजपचे उमेदवार  आपल्या 5वर्षाच्या कार्यकीर्दीत कोणासही त्रासदायक न ठरलेले परंतु कोणत्याही कामाचा गाजावाजा न करण्याच्या मानसिकतेने ग्रासलेल्या ऍड संजय धोटे यांना या वेळेस उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी पक्षांतर्गत गटबाजीला समोर जावे लागले.   पक्ष शिस्तीच्या पुढे टिकावं न धरू शकणाऱ्या या वरवर दिसणाऱ्या बंडाळी-गटबाजी चा राग शेवटी "आपलेच कमळ-आपलेच सरकार" या नाऱ्यावर प्रचारात जरी पुढाकार नसला - आता शांततेत राग निर्वतला असल्याचे नाराजांचे बोल कानीं पडत आहेत.  तरीही उमेदवारांनी प्रचार सभांत महायुतीच्या मुख्य घटकांना डावलल्याची नाराजी ओढवून घेतली आहे. 

यापैकी मुख्य घटक शिवसेना तालुकाप्रमुखांचा  उमेदवारी नामांकन भरण्याच्या तारखेपासूनच लपंडाव सुरु असून आता प्रचार सभेचे आयते कोलीत सापडलेले तालुका प्रमुख राजूरकर यांनी वेळेवर पत्रकार परिषदेचा बाण सोडल्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी राजूरकर यांनी लोकसभेत हाच युतीधर्म सोडून बाळू धानोरकर यांचा केलेला उघड प्रचार व आता संघटनेच्या उमेदवारासोबत असलेली त्यांची सलगीची आठवण करून देत,  त्यांच्याच बाणाने त्यांनाच घायाळ करून तालुका प्रमुख असूनही नेहमीप्रमाणे पुन्हा तालुक्यात न दिसण्याचा सल्ला दिला असल्याची खमंग चर्चा आहे याउपर  जुने जाणते शिवसैनिक युती धर्म पाळाया सज्ज दिसत आहेत.ऐनवेळी आघाडीत बिघाडी होऊन हातचे आलेले तिकीट निसटल्याने नाराज राष्ट्रवादीचे निमकर अनेक कार्यकर्त्यांसहित लक्ष्मीरुपी कमळावर विराजमान झाल्याने स्थानबदलाच्या  प्रतिरूपाने दोन्ही प्रतिपक्ष किती फायद्यात राहतील त्यावर पुढचे नातेसंबंध टिकून राहतील असे अनेकांचे मत आहे.विधानसभेत पुन्हा पाय न ठेवण्याची शपथ घेणारे चौरंगी लढतीतील उमेदवार ऍड वामनराव चटप नेहमीप्रमाणेच संघटनेची हवा राजकीय वातवरणात निर्माण करण्यात पुन्हा एकदा यशस्वी झाले असून. साहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानणाऱ्या कार्यकर्त्यांची मेहनत किती फळाला येईल व मतदानाच्या दिवशी ही हवा खरंच विजयी मतांमध्ये परिवर्तित होईल याबाबत मतदार संभ्रमात दिसत आहेत.परंतु मागील 2014मध्ये भाजपाकडे वळलेल्या कार्यकर्त्यांपैकी फक्त 6कार्यकर्ते सोडून बाकी सर्व आता माझ्याच सोबत आहेत अश्या आशावादाला मतदार कोणता क्रमांक देतील हे 24ऑक्टोबर ला उघड होईलच.