विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार शिवसेनेत ? : पक्षात येण्यासाठी आतापर्यंत अनेक फोन, वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार शिवसेनेत ? : पक्षात येण्यासाठी आतापर्यंत अनेक फोन, वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

जसजशी राज्यातील विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग -आउटगोइंग वेगात सुरु असून भारतीय जनता पक्षाने माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना आपल्या गळाला लावून मोठा राजकीय भूकंप घडवला होता. 

मात्र शिवसेनेकडून देखील आता तसेच प्रयत्न सुरु असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षात घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा खुद्द वडेट्टीवार यांनीच केला आहे. 'मला बांद्र्यावरून आतापर्यंत 25 फोन आले आहेत', असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

चंद्रपूर येथे काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत एक मोठा गौप्यस्फोट करून, 'मला शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत आहेत', असा दावा त्यांनी केला होता.  'मला काही दिवसांपासून 'वर्षा'वरुन आणि बांद्र्यावरुन फोन येत आहेत. बांंद्र्यावरुन येणारे फोन जास्त आहेत. मला बांद्र्यावरून आतापर्यंत 25 फोन आले आहेत आणि भेटायला बोलावत आहेत. एक विरोधी पक्षनेता भाजप मध्ये गेला म्हणून दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेला त्यांच्या पक्षात न्यायचा आहे', असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटलांनीही विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर गेल्या महिन्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मोठ्या नेत्यांनी, आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. विरोधी पक्षातील आणखी बरेच लोक भाजप मध्ये येण्यास तयार असल्याचा दावाही भाजप नेत्यांकडून केला जात आहे. सध्या स्थितीत शिवसेनेत रोजचे इनकमिंग सुरु असून काँग्रेस व खासकरून राष्ट्रवादी काँग्रेस चे अनेक आमदार व मध्यम फळीतील नेत्यांनी शिवबंधन बांधले आहे.अशावेळी शिवसनेकडून थेट विरोधी पक्षनेत्यालाच पक्षात घेण्यासाठी तयारी सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष असलेले काँग्रेस चे जिल्ह्यातील जेष्ठ नेते मनोहर पाऊणकर यांनी मातोश्री येथे जाऊन शिवबंधन बांधले त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस साठी हा एक धक्का असून राज्यात असाच एक अवाक करणारा पुढचा प्रवेश हा जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणारे व पूर्वाश्रमीचे शिवसैनिक वडेट्टीवारांचा तर नाही ना?  अशी खमंग चर्चा चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.