प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे वेकोलिच्या भटाळी खाण विस्तारीकरणाकरिता जनसुनवाई : गावकऱ्यांची जमीन अधिग्रहणाला सहमती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे वेकोलिच्या भटाळी खाण विस्तारीकरणाकरिता जनसुनवाई : गावकऱ्यांची जमीन अधिग्रहणाला सहमती

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : भटाळी -

वेकोलि चंद्रपूरच्या वतीनं भटाळी कोळसा खाणीचं विस्तारीकरण योजना प्रलंबित आहे.त्यासाठी अधिकची शेकडो हेक्टर जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे.
यासाठीची जनसुनावणी आज घेण्यात आली. यात गावक-यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यामुळं या खाणीच्या विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झालाय.

चंद्रपूर शहराला लागूनच असलेल्या भटाळी खाणीचा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या खाणीलगत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा असल्यानं तो बाहेर काढण्यासाठी वेकोलिनं तयारी केली आहे. त्यासाठी शेकडो हेक्टर जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. ही जमीन भटाळी येथील शेतक-यांची आहे. 

त्यांनी नव्या प्रकल्पासाठी जमीन देण्यास तयारी दर्शवली आहे. योग्य मोबदला, नोकरी आणि गावाचं पुनर्वसन, या महत्त्वाच्या मागण्या गावक-यांच्या आहेत. 

जमीन अधिग्रहणासंदर्भातील पहिली प्रक्रिया म्हणजे जनसुनावणी. आज भटाळीच्या लोकांना बोलावून प्रदूषण नियंत्रण मंडळानं जनसुनावणी घेतली. यात गावक-यांनी आपले विविध प्रश्न मांडले आणि त्याची उत्तरं वेकोलिच्या अधिका-यांनी दिली. 

या जनसुनावणीला प्रदूषण नियंत्रण अधिकारी मधुकर लाड, अप्पर जिल्हाधिकारी भुगावकर हे उपस्थित होते. दिलेल्या आश्वासनानुसार, जर मागण्या पूर्ण होणार असतील, तर आम्ही जमिनी देण्यास तयार आहोत, अशी गावक-यांची भूमिका आहे.

भटाळी खाणीच्या विस्तारीकरणासाठी सुमारे साडेचारशे हेक्टर जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. या जमिनीचा मोबदला शासनाच्या धोरणानुसार जागेची प्रतवारी बघून दिला जाणार आहे. 

सोबतच एक नोकरी जमीनमालकास दिली जाणार आहे. भटाळी गावाच्या पुनर्वसनासाठी योग्य जागांची पाहणी केली जात असून, गावक-यांच्या मतानुसार ही जागा निश्चित केली जाणार आहे. 

नियोजित खाण ही ताडोबाच्या बफर क्षेत्रापासून जवळच असल्यानं पर्यावरणवादी यावर काय भूमिका घेतात, हे नजीकच्या काळात दिसेलच.