सुजात आंबेडकर यांच्या वक्तृत्वाने युवकांत नवा संचार : चंद्रपुरात युवकांशी साधला संवाद - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सुजात आंबेडकर यांच्या वक्तृत्वाने युवकांत नवा संचार : चंद्रपुरात युवकांशी साधला संवाद

Share This
 खबरकट्टा / चंद्रपूर :   

   
भाजप सत्तेत आल्यापासून अनुसूचित जाती व जमाती तसेच अल्पसंख्याकावरचे जातीयवादी हल्ले वाढले आहेत. सत्ताधाऱ्यांनी कायम बहुजन वर्गाला मुख्य प्रवाहापासून वंचित, उपेक्षित ठेवले आहे. त्याचप्रमाणे कांग्रेस व भाजप दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत असा आरोप युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला. ते राजीव गांधी कामगार भवन येथे आयोजित विद्यार्थ्यांशी, युवकांशी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
 
        
भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच वंचित बहुजन युवक आघाडीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद विद्यार्थ्यांशी, युवकांशी या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित विद्यार्थी व युवकांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धीरज तेलंग, भारिप बमं तसेच वबआचे प्रदेश महासचिव कुशल मेश्राम, वबआचे  पूर्व जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, पश्चिम अध्यक्ष राजराव , पूर्व महासचिव धीरज बांबोळे, पश्चिम महासचिव रमेश ठेंगरे, प्रा. प्रकाश इंगळे, चिमुरचे नेते डॉ. रमेश गजभे, महिला आघाडीच्या अध्यक्षा लता साव, महासचिव कविता गैरकार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.   
    
सत्ताधाऱ्यांनी कायम वंचितांची दिशाभूल केली. सत्तेपासूनही वंचित ठेवले. देशात व राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून बेरोजगारी, बलात्कार, महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारखाने, उद्योगधंदे बंद पडली असून लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. देशात अस्थिरतेचे, अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
  
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थ्यांशी विद्यापीठात जातीय भेदभावाची वागणूक देण्यात येत आहे. शेतकरी, कामगारांची पिळवणूक या सत्ताधाऱ्यांनी केली आहे. आता लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या व अधिकार मिळवण्यासाठी या वंचित जात समूहांना सत्तेत पाठवणे हाच मुख्य पर्याय असून वंचित बहुजन आघाडीच्याद्वारेच ही मोट बांधता येईल असा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला.युवकांनी आता विधानसभा निवडणुकीत जबाबदारीने आपली भूमिका बजावून प्रस्थापित हुकुमशाही सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी युवकच मुख्यस्थानी असून प्रत्येकांनी आपली जबाबदारी ओळखून वंचित बहुजन आघाडीचा गॅस सिलेंडर घरोघरी पोहचवावा असे आवाहन सुजात आंबेडकरांनी  शेकडोच्या संख्येने उपस्थित युवकांना केले.