सद्यस्थिती राजकीय विश्लेषण : वाचा राजुरा विधानसभेतील 'मतदार' कोणत्या पक्षाबद्दल काय विचार करतो ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सद्यस्थिती राजकीय विश्लेषण : वाचा राजुरा विधानसभेतील 'मतदार' कोणत्या पक्षाबद्दल काय विचार करतो !

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :सद्यस्थिती राजकीय विश्लेषण


राजुरा विधानसभेत स्थानिक आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असताना देखील अनेक कामे करूनही त्याचा प्रभाव कुठेतरी कमी पडत आहे, त्यामुळे जनसामान्यांत त्यांच्याविषयी नाराजी दिसत असली तरीही तरीही त्यांच्या सोज्वळ, संयमी स्वभावाला अनेक गावकरी व अधिकारी वर्गाची पसंती आहे. 

तर, भाजपामध्ये उमेदवार बदलाच्या अंतर्गत हालचालींना उत आला असून जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, व्यावसायिक राध्येशाम अडानीया, खुशल बोंडे यांनी भाजपाच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु केलेली दिसते. 

त्यापैकी अडानिया हे फक्त पब्लिसिटी स्टंट असून पक्षाचे वरिष्ठ नेते खुशाल बोन्डे यांनी आजी आमदारांच्या बाजूने समर्थन दिले असल्याचे अंतर्गत वर्तुळात चर्चिले जात असून शेवटच्या क्षणाला भाजपाची उमेदवारी कोणाला मिळते, यावर राजुरा विधानसभा क्षेत्राची समिकरण ठरतील असे ठोस मत आमच्या सर्व्हे मधील जास्तीत जास्त मतदारांचे आहे.

भाजपात अंतर्गत गटबाजी असली तरी निवडणुकीच्या वेळी पक्षीय कड़क शिस्तीचा भाग म्हणून सर्व एकत्रित आले तरचं भाजपाची उमेदवारी भक्कम ठरेल. परंतु, लोकसभा निवडणुकीत झालेल्या अंतर्गत गटबाजीचा अनुभव बघता विधानसभा निवडणुकीत याचा पक्षाला फ़टका बसू शकतो असे अनेक कार्यकर्त्यांचेच मत आहे.
-----------------------------------------------------------
तर काँग्रेस लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून इन्फेंट जीसस स्कूल मध्ये अल्पवयिन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात येथील काँग्रेस नेत्यांची नाव समोर आल्याने समीकरण बदलली. 

हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि शहरातल्या बाजारपेठा देखील कडकडीत बंद होत्या. आदिवासी समाजात या प्रकरणामुळे सुभाष धोटे यांच्याविषयी नाराजी असताना देखील काँग्रेसची तिकीट त्यांनाचं मिळणार असल्याने काँग्रेस बैकफुटला जाण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत. 

परंतु, ऐनवेळी कॉग्रेसची जागा अविनाश जाधव, राहुल पुगलिया किंवा सुदर्शन निमकर यांनी खेचुन आणल्यास काँग्रेसची स्थिती चांगली होऊ शकते असे अनेक खेडोपाडी नागरिकांचे मत आहे.
-----------------------------------------------------------
गेल्या ४० वर्षापासून शेतकरी संघटना ही चळवळ अ‍ॅड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात सुरु आहे. तीनदा शेतकरी संघटना चळवळीतील आमदार या भागात आहे. परंतु, गेल्या १० वर्षात अ‍ॅड. वामनराव चटप यांनी विधानसभा न लढविल्याने अनेक पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आता दुरावले असून त्यांना जवळ करणे आता त्यांना कठीण जात आहे. 

तर, कमकुवत आर्थिक परिस्थिती व सद्यस्थितीत दुसऱ्या कडीतील कमकुवत कार्यकर्त्यांची फौज यामुळे ही निवडणूक वामनरावांना सोपी नाही. परंतु, त्यांना ऐनवेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीचे बळ मिळणार आहे. तर, भाजपामध्ये उमेदवारीबाबत असलेली संदिग्धता या बाजू त्यांच्यासाठी जमेच्या ठरू शकतात. 

2014 ला जी भाजपाची या विधानसभा क्षेत्रात अवस्था होती, तिच्याशी साधर्म्य असणारी परिस्थिती शेतकरी संघटनेची आहे. शेवटच्या काही दिवसातील समीकरण हे मागील निवडणुकीत प्रभावी ठरले होते. त्यामुळे गतवेळी भाजपाने जुळविलेले समीकरण ही यावेळी वामनराव जुळवू शकतील का ?  हे बघणे उत्सुकतेचे ठरले. परंतु, एकट्या शेतकरी संघटना या चळवळीच्या जोरावर वामनरावांना ही निवडणूक कठिण आहे.

बसपा, गोंडवाना गणतंत्र पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष या पक्षाचे उमेदवार फोडाफोडीचे राजकारण करतील. त्यामुळे यांची भूमिका देखील महत्वाची असेल.

परंतु, खरी लढत ही तिरंगी होईल अशी यावर बहुतेक मतदारांचे एकमत आहे.

(सूचना : वरील विश्लेषण हे राजुरा विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या चारही तालुक्यातील अनेक नागरिकांसोबत चर्चा करून त्याचे एकत्रीत मांडलेले मत असून या प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. हा फक्त मतदारांच्या मनातील वस्तुस्थिती मांडण्याचा लहानसा प्रयत्न आहे.)