जिह्यातील आदर्श ख्यातीप्राप्त "घाटकुळ" ठरले राज्यातुनही तृतीय क्रमांकाचे आदर्श गाव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिह्यातील आदर्श ख्यातीप्राप्त "घाटकुळ" ठरले राज्यातुनही तृतीय क्रमांकाचे आदर्श गाव

Share This
आदर्श गाव म्हणून घाटकुळची निवड कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्रामपरिवर्तकाने ग्रामविकास आराखडा तयार केला व अंमलबजावणी केली‌. गावक-यांचा प्रतिसाद वाढला. तालूका व जिल्हा प्रशासनासोबत ग्रामपरिवर्तक व गावाने साधलेल्या समन्वयातून गाव पुढे आले. या पुरस्काराने जिल्ह्याचा नावलौकीक राज्यात झाला आहे.-राहूल कर्डीले,मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर

खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा 
            
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श ग्राम स्पर्धेचा निकाल मूल्यांकन समितीचे अध्यक्ष तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी जाहीर केला आहे‌. यात जिल्ह्यात पोंभूर्णा  तालुक्यातील घाटकुळ गावाने राज्यात बाजी मारून आदर्श गावाचा तृतीय पुरस्कार पटकावला आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम व लोकसहभागाने गावाच्या झालेल्या कायापालटाची दखल राज्यस्तरावर घेतल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकाच्या सहकार्याने मागील दोन वर्षात गावात झालेल्या कामाची दखल या स्पर्धेत घेण्यात आली. या कामांच्या आधारावर आदर्श ग्राम स्पर्धा राबवण्यात आली. त्यात वर्धा, नंदुरबार, चंद्रपूर, यवतमाळ, पुणे, रायगड, गडचिरोली, अमरावती, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या १२ जिल्ह्यातील २६ गावांची जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत निवड करण्यात आली होती. राज्यस्तरीय मूल्यांकनात नंदुरबार जिल्ह्यातील चिखली या आदिवासीबहुल गावाला आदर्श ग्रामचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. अमरावती जिल्ह्यातील शेंदोळा खुर्द व यवतमाळ जिल्ह्यातील गणेशवाडी गावाला द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. राज्यस्तरावर तृतीय पुरस्कारात चंद्रपूर जिल्ह्यातील घाटकुळ गावाने बाजी मारली आहे.
मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांनी मेहनत घेवून गाव एकत्रिकरण केले. गावाला प्रेरणा मिळाली. मागील दोन वर्षात गावात झपाट्याने कामे झाली. ग्रामपंचायत, शासन आणि गावकरी यांच्या प्रयत्नातून  आदर्श गाव झाल्याचा सार्थ अभिमान आहे.-प्रीती निलेश मेदाळे,सरपंच, ग्रा.पं.घाटकुळ
तालुका व जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले घाटकुळ गाव विकासकामे, नाविन्यपूर्ण उपक्रम व लोकसहभागाने आदर्श गाव म्हणून नावलौकिकास आले. गावातील शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत आयएसओ नामांकित आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा लोकराज्य मासिक उपलब्ध होत असून जिल्ह्यातील पहिले 'लोकराज्य ग्राम' ठरले आहे.

प्रत्येक महिन्याला 'ग्रामसंवाद' या नाविन्यपूर्ण उपक्रमात विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे थेट मार्गदर्शन गावक-यांना मिळते. पेपरलेस ग्रामपंचायत, वेबसाईट, मोबाईल ॲप्स, सुसज्ज व्यायामशाळा, वाचनालय, शुद्ध पिण्याचे पाणी, वृक्षलागवड, बंदिस्त गटारे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शोषखड्डे, बायोगॅस, स्वच्छता व शौचालयाचा वापर, युवक व बचत गट सक्षमीकरण, श्रमदान, दारूबंदी, ग्रामसभा सक्षमीकरण व नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्य स्तरावर दखल घेण्यात आली. 

गावाची एकता व प्रयत्नांचा हा विजय आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, प्रशासन व गावक-यांनी पुढाकार घेवून सहकार्य केले. आदर्श गाव म्हणून राज्यात दखल झाल्याने परिश्रमाला यश मिळाल्याचा आनंद आहे. ग्रामविकासाचा अनुभव समृद्ध करणारा आहे. गावाच्या शाश्वत विकासासाठी कटीबद्ध आहे -अविनाश पोईनकर,मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक, घाटकुळ 

हरित व स्वच्छ ग्राम तसेच ग्रामस्वच्छता अभियानात देखील गावाने बाजी मारली आहे. ग्रामविकासासाठी सरपंच प्रीती निलेश मेदाडे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, ग्रामसेवक ममता बक्षी, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, पं.स उपसभापती विनोद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अरुण मडावी, पत्रू पाल प्रज्ञा देठे, सुनिता वाकुडकर, कुसुम देशमुख, कल्पना शिंदे, रजनी हासे, पोलीस पाटील अशोक पाल, तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक मेदाळे, राम चौधरी, आकाश देठे, स्वप्नील बुटले, उत्तम देशमुख, अनिल हासे, वामन कुद्रपवार, मुकुंदा हासे, विठ्ठल धंदरे, चांगदेव राळेगावकर, मनोज बोरकुटे, प्रतिमा दुधे, अंगणवाडी सेविका, शिक्षकवर्ग यांचेसह गावातील मराठा व जनहित युवक मंडळ, निर्मल महिला ग्रामसंघाच्या महिला, गावकरी ग्राम विकासासाठी कटिबद्ध आहे. गटविकास अधिकारी धनंजय साळवे, व्हिएसटीएफ समन्वयक विद्या पाल, चंद्रशेखर गजभिये, तालुका व जिल्हा प्रशासनाने विशेष सहकार्य केले.

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत घाटकुळ हे गाव अल्पावधीतच पुढे आले. स्पर्धेमुळे चंद्रपुर जिल्ह्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे .शासन, प्रशासन व गावकरी यांच्यातील दुवा म्हणुन घाटकुळ येथील ग्रामपरिवर्तकाचे कार्य उल्लेखनीय आहे - विद्या पाल गजभिये,जिल्हा कार्यकारी, व्हिएसटीएफ