भद्रावती येथील एटीएम फोडी प्रकरणात एटीएमचे मेंटेनन्स आणि कॅश लोडींग करणारेच निघाले चोर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भद्रावती येथील एटीएम फोडी प्रकरणात एटीएमचे मेंटेनन्स आणि कॅश लोडींग करणारेच निघाले चोर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर प्रतिनिधी :

4 ऑगस्ट रोजी भद्रावती पोलिस ठाण्यांतर्गत रेल्वे स्थानक मार्गावरील मंजुषा ले आउटमधील हिताची कंपनीचे एटीएम फोडून 22लाख रूपये लंपास केल्याची तक्रार कंपनीचे कर्मचारी प्रशांत वैद्य यांनी दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींना अटक केली असून एटीएमचे मेंटेनन्स आणि कॅश लोडींग करणारेच चोर निघाले आहेत. आरोपींनी एटीएममधून 22 लाख 84 हजार 100 रूपये लंपास केले होते.


अभियंता नितिन तुळशिराम गेडाम (36) रा. गोपालपुरी चंद्रपूर, कॅश लोडर मंगेश सुखदेव धाबर्डे (32) च गोपाल भाउराव इंगोले (36) रा. बालाजी वार्ड गोपालपुरी चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रशांत वैद्य यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. मशिनला नेमके कोणत्या वस्तूने तोडण्यात आले, कशा पध्दतीने पैसे काढण्यात आले याचा तपास करण्यात आला. यानंतर चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण एटीएमचे देखरेख करणारा एनसीआर कंपनीचा इंजिनिअर नितीन गेडाम याला बोलावून त्याची विचारपूस करण्यात आली. 


सोबतच कॅश लोड करणारे सीएमएस कंपनीचे कॅश लोडर मंगेश धाबर्डे आणि गोपाल इंगोले यांचीसुध्दा चौकशी करण्यात आली. एटीएम मशिनचे संपूर्ण डिटेल काढण्यात आले. यात सदर मशिन नादुरूस्त झाल्याने अभियंता नितीन याला बोलाविण्यात आले होते.तसेच मशिनमधील कॅश संपूर्ण संपल्यामुळे लोडर यांनासुध्दा काॅल करून बोलाविण्यात आले होते. कॅश भरण्याच्या नावाखाली या तिघांनी संगणमत करून मशिनमध्ये छेडछाड करून 4 ऑगस्ट रोजी सकाळी 16 लाख रूपये आणि रात्री दरम्यान उर्वरीत रक्कम व एटीएमचे सिपीयु सुध्दा चोरून नेले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. 


काल 1 सप्टेंबर रोजी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आतापर्यंत 8 लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक ओ.जी. कोकाटे, भद्रावती पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक यादव यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्ता आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.