माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे आगामी विधानसभा निवडणुकीकरिता चटपांच्या उमेदवारीचे सोसिअल मीडिया वरून जाहीर आवाहन .? : ही विधानसभा निवडणूक वामनरावांसाठी कठीणचं...! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे आगामी विधानसभा निवडणुकीकरिता चटपांच्या उमेदवारीचे सोसिअल मीडिया वरून जाहीर आवाहन .? : ही विधानसभा निवडणूक वामनरावांसाठी कठीणचं...!

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा विधानसभा - गोमती पाचभाई 

राजुरा विधानसभेचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आधी काँग्रेस पक्ष्याच्या तिकिटावर आमदारकी भूषविली त्यानंतर सुभाष धोटे यांचे वर्चस्व काँग्रेस पक्षात वाढल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,  2014 निवडणूक पूर्व शिवसेना पक्ष प्रवेश आणि परत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 

आता राजुरा येथील एका प्रकरणाच्या चौकशीमुळे सुभाष धोटे बैकफुटला आले आहेत. परंतु, वारंवार पक्ष बदल करण्याच्या भूमिका व राजुरा अत्याचार प्रकणात त्यांनी स्वतः ला घरबंद करून घेऊन आदिवासी समाजाची नाराजगी ओढवून घेतल्यामुळे  सुदर्शन निमकर यांच्यासाठी ही जागा काँग्रेस पक्षाकडून मिळणे कठिण होते. दुसऱ्या पक्षातुन सुदर्शन निमकर लढ़ल्यास निवडून येणे अशक्य आहे. 
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2303900549850840&id=100006927523761

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार  सुदर्शन निमकर काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यातच आज Sudarshan Nimkar Ex Mla या  त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन "आपल्या हक्काचा माणूस वामनराव चटप... लक्ष 2019 विधानसभा" अशा आशयाची फोटो सहित पोस्ट "वामनराव चटप कट्टर समर्थक" या चटप यांच्या अधिकृत सोसिअल मीडिया पेज वरून शेअर करण्यात आल्याने हे निमकरांचे चटपानां जाहीर समर्थन तर नाही ना याची खमंग चर्चा सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे .

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2303900549850840&id=100006927523761                                         या लिंक वर टच करून बघा मूळ पोस्ट.  

यातून राजुरा विधानसभा क्षेत्रात नवे समीकरण जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, वामनराव चटप यांच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.

ही विधानसभा निवडणूक वामनरावांसाठी कठीणचं...!

एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या वामनरावांनी वकिलीचे शिक्षण घेतले. यशस्वी वकिली करीत असताना शरद जोशी यांच्या विचारांनी भारावून शेतकरी संघटनेत सक्रिय झाले. गेल्या ३९ वर्षापासून या चळवळीत असताना राजुरा विधानसभेतून तीनदा आमदार झाले. 

परंतु, २००९ साली वामनरावांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या राजकारणाचा उलट प्रवास सुरु झाला. २००९ साली लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी विधानसभा लढविण्याचा आग्रह केला. परंतु, त्यावेळी कार्यकर्त्यांचे काहीही न ऐकता त्यांनी विधानसभा न लढविण्याची घोडचूक केली. २०१४ साली पुन्हा लोकसभा निवडणुकीत वामनराव अपयशी झाले. 

या काळात राजुरा विधानसभा क्षेत्रात एका नवीन चेहऱ्याला स्पेस तयार झाली होती. नेमकी हिचं स्पेस विद्यमान आमदार संजय धोटे यांनी भरून काढली. २०१४ ला संजय धोटे यांच्या रूपाने भाजपला पहिल्यांदा या विधानसभा क्षेत्रात विजय मिळवता आला. आज भाजपाने योजनाबद्ध संघटनात्मक बांधणी या विधानसभा क्षेत्रात केली आहे. राजुरा येथील आदिवासी अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी काँग्रेस नेते बॅकफूटला आले. भाजप नेत्यांनी दरम्यानच्या  काळात आदिवासी समाजातील नेत्यांना आपलेसे करून घेतले. 

आज शेतकरी संघटनेकडे एकही जिल्हा परिषदेची जागा नाही. बोटावर मोजण्याइतके पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य आहे. जिवती व गोंडपिपरी तालुक्यात वामनरावांचे प्रभावी संघटन राहिले नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे युवक वर्ग शेती व्यवसायापासून दूर जाताना शेतकरी संघटनेला विन्मुख झाला आहे. आज कुठलाही अभ्यासू व प्रभावी युवक चेहरा वामनरावांसोबत फिरताना दिसत नाही. 18 ते 30 वयोगटातील युवकांना त्यांचे जुने कार्य देखील माहिती नाही. 

आता लोकांचा ओढा राष्ट्रीय पक्षाकडे वाढला असून भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्ष संघटनात्मक पातळीवर विधानसभा क्षेत्रात मजबूत झाले आहेत. सुरवातीला काँग्रेसला पर्याय म्हणून शेतकरी संघटना असे या विधानसभा क्षेत्राचे समीकरण होते. आता, मात्र समीकरण बदलले आहे. विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, नांदा, जिवती, पाटण या निमशहरी भागात शेतकरी संघटना तिसऱ्या क्रमांकावर पोहचलेली दिसते.

राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत आर्थिक शक्ती देखील वामनरावांची कमी पडत असून जुने कार्यकर्ते निष्क्रिय झाले आहे. युवकांना आकर्षित करणारा युवा चेहऱ्याचा अभाव, नव्या चेहऱ्यांना सामावुन घेण्याची नसलेली वृत्ती आणि दुबळे झालेले संघटन यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची वाट वामनरावांसाठी बिकटचं आहे. 

मी यापुढे कधीच विधानसभा लढणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा घेणारे वामनराव आता विधानसभा लढवीत आहे. किमान उरलेले कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी ही निवडणूक वामनराव लढवत आहेत की काय.? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  कारण, निडणुकीला अवघे 3 महिने बाकी असताना निवडणूक जिंकण्याचा दृष्टीने कार्यकर्त्यांचे संघटन, युवकांचा सहभाग, नियोजनबद्ध प्रचार आखणी या सर्व पातळीवर सध्यातरी वामनराव पिछाडीवर आहे. 

दुसरीकडे भाजपाचे पन्ना  प्रमुख(सोसिअल मीडिया ), शक्ती प्रमुख, बूथप्रमुख त्यासोबतच युवक आघाड्यादेखील गठीत झाल्या आहेत आणि हे सर्व कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत. 

काँग्रेसने प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक फेरबांधणी केली असून लोकसभा निवडणुकीतील यशाने कार्यकर्त्यांत जोश संचारलेला दिसतो. राष्ट्रीय पक्ष प्रचारात आघाडीत असताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत मात्र निरुत्साह दिसतो.