खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना ग्रामीण प्रतिनिधी -
कोरपना तालुक्यातील नांरडा ग्रामपंचायतिचे सरपंच, उपसरपंच व 2 सदस्य यांना घरपट्टी व पाणीपट्टी विहित मुदतीत न भरणे कारणावरून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिनांक 3 जून 2019 ला पदासह सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश पारित करून प्रशासकाची नेमणूक करण्यात असल्याचे कळविले होते.
नाममात्र घरपट्टी व पाणीपट्टी विहित मुदतीत भरता न आल्याने सरपंच उपसरपंच व दोन ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे पद व सदस्यत्व रद्दबाबत सरपंच वैशाली बंडू गेडाम , उपसरपंच अनिल मंगल शेंडे , ग्रामपंचायत सदस्य रूपाली नीतेश भोंगळे व माया सुरेश शेंडे या चौघांनीही ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी थकविल्याने ग्रामपंचायत सदस्य सदाशिव महादेव पोटदुखे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे ग्रामपंचायत अधिनियम 1985कलम 14(ह) कारवाईची मागणी केली असता प्रकरण दाखल करून चौकशी चौघांचेही पद व सदस्यत्व रद्दबातल करून आदेश केल्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपणा यांनी नांरडा ग्रामपंचायतीवर डी टी मुकाडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
या आदेशावर सरपंच वैशाली बंडू गेडाम,उपसरपंच अनिल शेंडे,ग्रामपंचायत सदस्य माया शेंडे यांनी नागपूर विभागीय अप्पर आयुक्त यांचेकडे अपील सादर केली असता नागपूर विभागीय अप्पर आयुक्त ए एस आर नायक यांनी सर्व अपिलार्थी यांचे अर्ज, मौखिक युक्तिवाद, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी पारित केलेला आदेश व अर्जासोबतचा अभिलेख या सर्वांचे अवलोकन करून अपिलार्थी च्या युक्तिवादात तथ्य आढळून आल्याचे नमूद करून अपिलार्थी चा अर्ज मंजूर करून पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थागिती दिली आहे.