खबरकट्टा / चंद्रपूर :'
'एएनआय' या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेर प्रदेशातील टप्पल येथे एका अडीच वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. अलिगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ मे रोजी या प्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.
अनन्वित अत्याचारांमधून तिची हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. संबंधित प्रकरणी दोन इसमांवर गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे.
पालकांनी घेतलेलं १० हजार रुपयांचं कर्ज फेडता न आल्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अतिशय निर्घृणपणे करण्यात आलेल्या या हत्येचा सोशल मीडियावर तीव्र निषेध करण्यात येत आहे. अनेकांनीच त्या चिमुरडीला न्याय मिळाला यासाठी तिच्या नावाच्या हॅशटॅगसह एक मोहिम सुरु केली आहे.
याच मोहिमेचा भाग म्हणून काल दिनांक 09 जून 2019 ला चंद्रपूर येथील जगदंब ढोल ताशा पथकाद्वारे आयोजित अनेक युवावर्गाच्या उपस्थितीत शिवाजी चौक ते जटपुरा गेट पर्यंत "लहान मुलांच्या सुरक्षेच्या"प्रश्नाकडे लक्ष वेधत भव्य कँडल मार्च काढण्यात आला.
यावेळी आरोपींना सर्वाधिक कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रकर्षाने करण्यात आली. दरम्यान, संपूर्ण देशभरात सध्या या प्रकरणाला हवा मिळत असून पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अतिशय क्रूर अशा या घटनेमुळे सारा देश हळहळला आहे.
यात सपना खेडेकर, प्रशांत माटूरवार,विजय केळझरकर, दानिश राई,शुभम कल्लूरवार,प्रणव उत्तरवार,राकेश बोनगीरवार,सागर मुक्कावार,चेतन, गुंजन, धनेश या जगदंब ढोल ताशा पथकाच्या सदस्यासहित अनेक युवाक -युवती सहभागी झाले होते.