संघर्ष करुन निर्मीती करणा-या कामगारांवर सातत्याने अन्याय :सास्ती १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संघर्ष करुन निर्मीती करणा-या कामगारांवर सातत्याने अन्याय :सास्ती १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे आयोजन

Share This
-जाब विचारण्यासाठी समोर येण्याचे आवाहन
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
संपुर्ण जगाची निर्मीती कामगारांनी आपल्या श्रमाने केली असुन अथक संघर्ष करुन आपले हक्क मिळवून घेतले आहे. आपल्या देशात संविधानाने आपल्या अधिकारांची रक्षा केली, परंतू आता श्रम करणा-यांचे हक्क व अधिकार डावलले जात असुन देश चालविणा-यांच्या नियतीकडे आता संशयाने पाहिले जात आहे. शिवाजी, फुले, आंबेडकर यांच्या  संघर्षापासुन प्रेरणा घेऊन आणि आपल्यातील सर्व भेदाभेदाला मुठमाती देऊन आता संपुर्ण कामगार,शेतकरी, शेतमजूर व श्रमनिष्ठ लोकांनी एकत्र येऊन याचा जाब विचारला पाहिजे आणि संघर्षास सिध्द झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुरोगामी विचारवंत प्रा. संजय मंगर यांनी केले. 

राजुरा तालुक्यातील सास्ती टाऊनशिप येथील कामगार मैदानात १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमीत्त आयोजीत भव्य जाहिर सभेत प्रा. संजय मंगर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटकचे केंद्रीय अध्यक्ष नंदकिशोर म्हस्के होते. प्रमुख अतिथी प्रा.डाँ.आस्तिक मुंगमोडे, राजु झोडे इ. मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
           
यावेळी पुढे बोलतांना मंगर म्हणाले की, सद्यस्थितीत देश एका वेगळ्याच वळणावर आहे. भेदाभेद करुन राज्य करा, ही निती पुन्हा अवलंबिली जात आहे. देशात सर्व काही नैसर्गिक परिस्थिती व   संसाधने असतांना राज्यकर्ते मात्र सातत्याने  सर्वसामान्य जनता,मेहनत करणारा समुह यांच्याविरोधात भूमिका घेत असुन उद्योगपतींसाठी मात्र लाल गालीचा अंथरला जात आहे. या सर्व बाबी अनेक शासकिय, गैरशासकिय व आंतरराष्ट्रीय अहवालातून वेळोवेळी स्पष्ट झाल्या आहेत. यावर आता कामगारांनी प्रश्न विचारायला शिकले पाहिजे, असे मत मंगर यांनी मांडले. डाँ. आस्तिक मुंगमोडे यांनी देशातील एकुण परिस्थितीची जाणिव देऊन आतातरी आपल्या हितासाठी, संविधानाच्या बचावासाठी आणि ख-या अर्थांने प्रगतीसाठी एकजुट दाखवून प्रश्न विचारायला शिकले पाहिजे,असे मत मांडले. 
         
यावेळी कामगार नेते राजु झोडे यांनी बोलतांना वेकोलि क्षेत्रात ठेकेदारी कामगारांची अवस्था वाईट असुन त्यांना न्याय मिळणे आवश्यक असल्याचे मत मांडले. नंदकिशोर म्हस्के यांनी अध्यक्षपदाहून बोलतांना देशातील कामगार चळवळीचा आढावा घेऊन येणारी परिस्थिती अतिशय बिकट राहणार असल्याचे अनेक उदाहरणे देऊन सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर ठाकरे, संचालन दिलीप कनकुलवार व आभार दिनेश पारखी यांनी मानले.
          
१ मे कामगार दिनानिमीत्त सास्ती टाऊनशीप येथे सायंकाळी सहा वाजता भव्य रँली काढण्यात आली. शेकडो कामगार,युवक व महिलांनी जोरदार घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला. या रँलीचे रुपांतर नंतर जाहिर सभेत झाले. या संपुर्ण परिसरात तोरण लावून सुशोभित करण्यात आला. सकाळी वेकोलिच्या सर्व कोळसा खाणीत कामगार दिनानिमीत्त ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमात लक्ष्मण घुगूल,रायलिंगू झुपाका,श्रंयाम कुत्तरमारे, रंगराव कुळसंगे, श्रीपुरम रामलू, पुरुषोत्तम मोहुर्ले,गुलाब टेंभुर्णे,साईनाथ ढवस, विलास भोयर,विनोद देरकर,रविंद्र डाहुले,दिनेश जावरे,शेख सलिम, मधुकर डांगे, गजानन धकाते, दिलीप डेरकर,केशव सातपुते, नंदकुमार मोहुर्ले,रमेश अंगुरी,शंकर मुत्यालू,रेखा भांडारकर,रेखा कुत्तरमारे, सिधू बारसिंगे,लता जगताप,सुनिता बोबडे यांचेसह मोठ्या संख्येने कामगार परिवारासह सहभागी झाले. संयुक्त खदान मजदूर संघ, कोल वाँशरीज कामगार संघटना,ठेकेदारी मजदूर युनियन,मराठा सेवा संघ,उलगुमान कामगार संघटना, अ.भा.अंधश्रध्दा निर्मुलन समिती, किसान मजदूर सभा, प्रगती महिला मंडळ यांचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.