खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
राजुरा तालुक्यातील विरूर येथे आठवडी बाजाराला बल्लारपूर वरून पीकअप वाहन क्र. एम एच 34 एबी 6781 या वाहनाने भाजीपाला भरून जात असताना विरूर गावाजवळील नवेगाव फाट्याजवळील वळणावर या वाहनाचा टायर फुटल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटून अपघात झाला.
त्यात वाहन चालक प्रशांत गायकवाड यांचेसह 8 जण किरकोळ जखमी तर 3 जन गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान उषा कैलास रामटेके (वय 40) रा. बल्लारपूर यांचा मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
सविस्तर असे की राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे दर बुधवारला आठवडी बाजार भरतो, येथे गडचांदूर, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा व इतरही ठिकाणाहून बाजारात भाजीपाला व सामान विक्रेते येत असतात. सदर अपघाताची माहिती होताच विरूरचे ठाणेदार कृष्णकुमार तिवारी, पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, ए एस आय पठाण, सुदर्शन काळे, गेडाम घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तात्काळ मदत देण्यात मोलाचे सहकार्य केले.