नेत्यांच्या सभांचा राजकारणावर काय होणार परिणाम : दुधाचा पूर की दारूची वास - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नेत्यांच्या सभांचा राजकारणावर काय होणार परिणाम : दुधाचा पूर की दारूची वास

Share This
-चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा विशेष भाग -4

खबरकट्टा/राजकीय:(गोमती पाचभाई -मुख्य संपादक )


निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा व काँग्रेसने सभांमध्ये आघाडी घेतली आहे. जवळ जवळ लहानमोठ्या ६० ते ७० सभा दोन्ही पक्षांच्या झाल्या आहेत.


यावेळी हंसराज अहीर विरुद्ध बाळू धानोरकर यांच्यात रंगणाऱ्या या लढाईत भाजपाकडून सभांसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राज्यातील अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे आदी मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावली. 

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागात सभांची सरबत्तीचं लावली. काही तांत्रिक बिघाडाने भाजपाध्यक्ष अमित शहा सभेसाठी येऊ शकले नाही. तरी, त्या सभेत जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

दुसरीकडे काँग्रेसची राहुल गांधी यांची झालेली सभा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारी ठरली. ही या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठी गर्दी लाभलेली सभा ठरली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे स्टार प्रचारक विजय वड्डेटीवार, जेष्ठ काँग्रेस नेते शिवाजी मोघे यांच्या सभा झाल्यात.

एक बाब प्रामुख्याने नोंदवावी लागेल की, या सर्व सभांमध्ये पक्षातील कार्यकर्ते व राजकिय रस असणारे लोक येत होते. परंतु, सामान्य लोकांनी प्रचारसभांकडे पाठ फिरवली. सुरवातीच्या टप्प्यात प्रचारामध्ये काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी आघाडी घेतली. परंतु, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दूधवाला विरुद्ध दारूवाला अशी ही निवडणूक आहे, अस विधान केल्यानंतर काँग्रेस उमेदवार यांचे लायसन्स असलेले दारूचे दुकान असल्याचे समोर आले. 

त्यानंतर दारूबंदीसाठी लढत असलेल्या नेत्या पारोमिता गोस्वामी, स्वामिनीचे महेश पवार यांनी थेट भाजपा उमेदवारास पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस काही अंशी प्रचारात बैकफुटला आली.

आता लढाई थेट दोन नेत्यात होत असली तरी वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांच्यासाठी ए. आय.एम.आय.एम.चे नेते असुद्दीन ओवैसी, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्याने काँग्रेसचा मुळ व्होट बँकला काही प्रमाणात धक्का बसला आहे. तर, चारदा खासदार होऊन देखील हंसराज अहीर यांना प्रचार सभांचा धडाका लावावा लागतो आणि सिनेसृष्टीतील अभिनेत्री अमीषा पटेल यांचा रोड शो करावा लागणे, त्यातून यावेळी भाजपासाठी लढाई कठिण झाल्याचे दिसत आहे.

त्याउपर ऐनवेळी अलोट गर्दी खेचणारी वणी येथे झालेली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा व उत्तर भारतीय बहुल बल्लारपूर क्षेत्रात झालेली केंद्रीय गृहराज्य मंत्री राजनाथ सिंग यांची सभा किती नवा जोश भरणार व  विरोधकांचे गणित किती वजा करणार औत्सुक्याचा विषय आहे. 

दरम्यान विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी या लोकसभा निवडणुकीत शांत राहण्याची भूमिका घेतली. त्यांनी कुठलीही मोठी सभा या लोकसभा क्षेत्रात घेतलेली दिसत नाही. दरम्यान २०१४ साली त्यांना मिळालेले २ लाख मतदान कोणाकडे वळेल ..? हा प्रश्न राजकीय जानकार व्यक्तींना पडलेला दिसतो. तर, भाजपाच्या सभांना ओबीसी नेते अशोक जिवतोडे यांनी उपस्थिती दर्शवत बऱ्याच ठिकाणी भाषण देखील केले आहे. काँग्रेस नेते नरेशबाबू पुगलिया यांनी काँग्रेसच्या कोणत्याही सभेला उपस्थिती लावली नाही. यातून ते बाळू धानोरकर यांना मदत करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

एकंदरीत सभांची रणधुमाळी संपली असली. एकमेकांवर वैयक्तिक टिका दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून होताना दिसले. आता, या दोन्ही उमेदवारांसाठी 'रात्र वै-याची आहे, जागते रहो..' अशी परिस्थिती आहे. मतदार राजा नेमका कोणाच्या बाजूने कौल देईल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.