माथरा गावातील नळ योजनेला लागले ग्रहण, पाणी पुरवठा समितीकडून अपहार केलेली रक्कम वसूल करा : गावकऱ्यांची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माथरा गावातील नळ योजनेला लागले ग्रहण, पाणी पुरवठा समितीकडून अपहार केलेली रक्कम वसूल करा : गावकऱ्यांची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा):
राजुरा तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या माथरा गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत सुरु झालेली नळ योजना १० वर्षांनंतरही पूर्ण न झाल्यामुळे गावकर्यात संबंधित विभाग व तत्कालीन पाणी पुरवठा समिती प्रति रोष दिसून येत आहे.


तालुक्यातील ६०० लोकवस्ती असलेल्या माथरा ग्राम पंचायत येथे २००९ ला गावातील नागरिकांना पिण्याकरीता पाणी मिळावे या करीता २० लाख ३४६ रुपयांची पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. यापैकी १० टक्के रक्कम लोकवर्गणीतून जमा करण्यात आली तर उर्वरित ९० टक्के रक्कम तीन टप्यात मंजूर करण्यात आली. 

लोकवर्गणीतून ४६ हजार ५०० रुपये जमा करण्यात आले. शासनाने पहिल्या टप्यात ८ लाख रुपये मंजूर केले. दुसऱ्या टप्यात ७ लाख ९५ हजार रुपये मंजूर केले. पण तत्कालीन पाणी पुरवठा समितीच्या निष्काळजीपणामुळे सदर योजना रखळत गेली. ग्रामसभेत दुसरी समिती गठीत करण्यात आली मात्र ती पण काही विशेष कार्य करू शकली नाही. उन्हाळ्यात आजही पाणीटंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. उन्हाळ्यात भूजल पातळी खाली गेल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वेकोलिने सदर गाव दत्तक घेतले असून नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात वेकोलिला अपयश आलेले आहे.

दहा वर्षा पूर्वी १२ जून २००९ ला ग्राम पाणी पुरवठा समितीकडे कामाच्या अंमलबजावणीचे अधिकार सोपविण्यात आले. या समितीचे अध्यक्ष शंकर लांडे हे होते. आगोदर टाकी व गावात पाइपलाइनचे कामे झाली. गावकऱ्यांत विशेषकर महिलां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले कि आता लवकरच पाण्याकरिता वणवण फिरावे लागणार नाही आहे. या समितीच्या कार्यकाळ संपल्या नंतर आशा हरिदास झाडे ह्या ग्राम पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्ष बनल्या तेव्हा सुद्धा कामे झालीत. त्यानंतर २७ जानेवारी २०१६ ला दिलीप नानाजी वैद्य हे ग्राम पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष बनले यांच्या २ वर्षाच्या कार्यकाळात १० बैठका झाल्या व स्वीचरूम, ट्यूबवेल च्या कामाकरिता ई-निविदा काढून पारदर्शिक पद्धतीने कामे करून सर्व हिशेब योग्य पद्धतीने संबंधित विभागाला देण्यात आले.

वैद्य यांच्या  कार्यकाळात गावातील काही लोकांनी जिथे पाण्याची टाकी बनली आहे त्या जागेचा विनाकारण वाद निर्माण केला तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहनिशा करून जागेचा वाद निकाली काढला व पंपहाऊस तसेच स्वीचरूम करीता नाहरकत प्रमाणपत्र दिले. तसेच वाढीव निधीचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती दिली. समिती व संबंधित विभागात समन्वय नसल्यामुळे दहा वर्ष लोटूनसुद्धा पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास निघालेली नाही. 

माझ्या कार्यकाळातील हिशेब समितीने खर्चाचा पावतीसह संबंधित विभागाला रीतसर सादर केले असून शासन निर्देशानुसार समितीकडे जमा असलेली उर्वरित रकम चेक द्वारे संबंधित विभागाला देण्यात आलेली आहे. - दिलीप वैद्य, ग्राम पाणी पुरवठा समिती 

शासननिर्णया नुसार ९ मार्च २०१८ ला बांधकामाचे सर्व अधिकार जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या योजनेतील उर्वरित शिल्लक निधी वर्ग करण्यात आला आहे. सर्व समित्यांनी खर्च केलेल्या रकमेचा हिशोब सादर करणे गरजेचे असून, ग्राम पाणी पुरवठा समितीने मात्र २५ हजार ६०० रुपयांच्या खर्च केलेल्या रकमेच्या रीतसर पावत्या संबंधित विभागाला सादर केलेल्या नाहीत त्यामुळे सदर पाणी पुरवठा योजना रखडली जात असल्याची माहिती दिली. 

अपहार केलेल्या रकमेचा हिशोब व वसूल करण्याचे अधिकार वरिष्ठ अभियंताला आहे. -  विलास भंडारी, कनिष्ठ अभियंता

ग्राम पाणी पुरवठा योजने अंतर्गत दीर्घकाळापासून रखळलेली नळ योजना लवकरात लवकर सुरू करून अपहार केलेल्या रकमेची रीतसर चौकशी करून ज्या समितीच्या कार्यकाळात अपहार झाला आहे तेव्हाचा समितीच्या पदाधिकार्यां कडून रकम वसुली करण्यात यावी. तसेच योजनेतील उर्वरित काम जसे पाण्याच्या टाकीला प्लास्टर करणे, सबमर्सिबल पम्प बसविणे, ट्यूबवेल ते पाण्याच्या टाकी पर्यंत पाईप लाईन टाकणे आणि महत्वाचे ९ वर्षांआधी टाकण्यात आलेली पाईप लाईन आता जागोजागी फुटली असून तिला तातडीने दुरुस्त करून गावकर्यांना पाण्यासाठी होणारी वणवण थांबवावी अशी ग्रामस्थाची मागणी आहे .

उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांचा टाहो -
गावात सद्यस्थितीत ६ हातपंप असून सर्वच हातपंपाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. सकाळपासूनच महिलांची गर्दी असते. पाण्याची पातळी खालावल्यामुळे महिलांची हातपंपावर दमछाक होत असते. घर, मुलांचे संगोपन व शेतीवरच काम आटपून आल्यानंतरस्वयंपाक करण्याच्या आगोदर पूर्ण कुटुंबातील सदस्यांकरिता हातपंप मधून पाणी भरावे लागते. कुटुंबातील मुले हि अभ्यास बाजूला सारून हातपंपा वरून पाणी भरत असल्याचे चित्र गावात गेल्यावर दिसून येत आहे.