असंतुष्ठ आत्मे ठरणार लोकसभेत गेमचेंजर... - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

असंतुष्ठ आत्मे ठरणार लोकसभेत गेमचेंजर...

Share This
खबरकट्टा / राजकीय  (विश्लेषण)-
(चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा विशेष :भाग -3)


यंदाच्या लोकसभेत दुहेरी लढत काँग्रेस आणि भाजपा मध्ये होत आहे. तरी दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात असंतुष्ट नेते आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इतर छोट्या-मोठ्या पक्षांत मोठ्या प्रमाणात असंतुष्ट नेते दिसतात. या असंतुष्ट मतांच्या टेकू वरच लोकसभेचा खासदार ठरणार अशी चिन्हे दिसायला लागलीये.


काँग्रेसमध्ये सुरुवातीला टिकीट मिळालेले विनायक बागडे यांची तिकीट कापल्या गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते नाराज झालेले दिसतात. त्यामुळे एका विशिष्ट समाजाचे लोक दुखावले असून तो मतदार आता बाळूभाऊ धानोरकर यांच्याकडे वळणे अशक्य वाटत आहे. तर काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश भाऊ पुगलिया हे देखील सध्याच्या काँग्रेस उमेदवारावर नाराज असून  त्यांचं मतदान हे काँग्रेसला पडण्याची काही एक चिन्ह दिसत नाही. त्यासोबतच बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रचाराचा धडाका बघितला  की, जुन्या काँग्रेस नेत्यांना धास्ती भरली आहे. जर बाळूभाऊ निवडून आल्यास पक्षातील आपले महत्त्व कमी तर होणार नाही ना..? हा प्रश्न काही काँग्रेस नेत्यांना पडू लागला आहे.

  
काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर  मामुलकर यांचा फोटो काँग्रेसच्या बॅनर वरून गायब झाल्याने राजुरा विधानसभेतील जुने काँग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.  याअंतर्गत राजकारणाची कीड काँग्रेसला फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे या सर्व असंतुष्ट आत्म्यांना सोबत कसे घेता येईल हे आव्हान बाळू धानोरकर यांच्यासमोर आहेस तर भाजप देखील काँग्रेस मधील असंतुष्ट आत्म्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न नक्की करेल. काँग्रेसमधील नाराज मंडळींना जर भाजपने मायेने 'अर्थ' साद घातली तर त्याचे परिणाम नक्कीच दिसेल.

हंसराज अहिर हे वीस वर्षापासून खासदार आहेत. केंद्रात मंत्रीपद देखील ते भूषवितात. भाजपमध्ये अंतर्गत भाऊ आणि भैय्या गट कार्यरत असल्याची जनतेत चर्चा आहे .यामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार गटातील अनेक कार्यकर्ते हंसराज भैया आहिर यांच्याकडून आपली कामे होत नाही म्हणून नाराज आहेत, अशे भाजप मधील अधिकृत सूत्र सांगतात. ही नाराजी भाजपाला दूर करता आली नाही, तर भाजपला देखील खिंडार पडेल. 

शिवसेनेमध्ये बाळू धानोरकर असताना आपल्यावर अन्याय होत होता अशी भावना असणारे शिवसैनिक आता जोमाने काम करू लागले आहे. शिवसेना नवनियुक्त जिल्हाप्रमुख संदीप गिरे हे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे .त्याबरोबरच बाळूभाऊ धानोरकर यांनी शिवसेना सोडल्यामुळे दु:खी झालेले शिवसैनिक हे देखील बाळूभाऊ पासून दूर होऊ शकतात. 

काँग्रेसचे माजी आमदार व सध्याचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते सुदर्शन निमकर यांची भूमिका नेहमीच संभ्रमात टाकणारी असते. ते ऐन वेळी कोणाचं काम करेल याचा भरवसा देता येत नाही , असे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे आज प्रचारात जरी महाआघाडीचा उमेदवार म्हणून बाळूभाऊ धानोरकर यांचा प्रचार ते करीत असले तरी त्यांची मते नेमकी कुणाला पडणार..? हे आत्ताच सांगता येणार नाही.

त्यासोबतच वणी क्षेत्रात शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत . एक गट हा नांदेकरांचा तर दुसरा गट हा  कातकडे यांचा आहे. यांची मते नेमकी कोणाच्या बाजूने पडतील हे देखील बघणे निर्णायक ठरेल. तर तेथील राष्ट्रवादीचे नेते महेंद्र लोढा यांनी सध्या तरी महाआघाडीचा प्रचार सुरू केला नाही असे दिसून येते. मनसेचे नेते राजू उंबरकर हे महाआघाडीच्या मंचावर दिसत असले तरी बाळूभाऊ धानोरकर यांचा विजय  झाल्यास तेथील त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे संजय देरकर यांचे  पारडे जड होईल त्यामुळे ऐन वेळेवर त्यांचे मत देखील महाआघाडीला पडण्याची शक्यता कमी वाटते.

काँग्रेसच्या उमेदवारावर विरोधकांकडून मुख्य होत असलेला आरोप म्हणजे जर हा उमेदवार निवडून आला तर जिल्ह्यात पुन्हा एकदा चंद्रपुर जिल्ह्यात दारू सुरू होईल. त्यामुळे श्रमिक एल्गार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाळूभाऊ धानोरकर यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. श्रमिक एल्गार संघटनेच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांची महिलांमध्ये मोठी क्रेझ आहे. अनेक घरात पुरुषांची मते बाळू भाऊला मिळत असली तरी महिलांची मते मात्र बाळू भाऊला मिळण्याची सुतराम शक्यता नाही, असे श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते सांगताहेत.

एकंदरीत आता खऱ्या प्रचाराला सुरुवात झाली असली तरी प्रचाराचा खरा रंग शेवटच्या काही दिवसातच कळेल.

सध्यातरी दोन्ही पक्षाचे नेते तुल्यबळ आहेत आणि दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात नाराज कार्यकर्त्यांची फौज आहे.

त्यात जुना इतिहास तपासल्यास काँग्रेसचे नेते एकत्रित  काम करण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी कितीही असली तरी प्रचारात मात्र सर्व एकत्रित फिरतात आणि मतदान विभाजित होऊ देत नाहीत, ही जूनी पार्श्वभुमी आहे. त्यासोबतच आगामी विधानसभाचे गणिते बघून काही  नेते आपली भूमिका ठरवणार आहेत. राजकारणात असंतुष्ठ आत्मे नेहमीच गेम चेंजर ठरतात यावेळीही असंतुष्ट आत्मे नेमकी काय भूमिका बजावतात याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.