सास्ती गावाजवळ गाईला वाघाने मारले:वेकोलि परिसरात दहशत:सावधानता बाळगण्याची सूचना व बंदोबस्त करण्याची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सास्ती गावाजवळ गाईला वाघाने मारले:वेकोलि परिसरात दहशत:सावधानता बाळगण्याची सूचना व बंदोबस्त करण्याची मागणी

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर (राजुरा विशेष प्रतिनिधी):
               
राजुरा तालुक्यातील सास्ती गावाजवळील वेकोलिच्या बंकरजवळ वाघाने एका गाईला मारल्याचे निदर्शनास आले आहे. दोन दिवसापूर्वी घडलेली ही घटना आज लक्षात आल्याने सास्ती-धोपटाळा गाव व वेकोलि कर्मचा-यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 


दरम्यान वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन वाघाच्या संभाव्य हालचाली टिपण्यासाठी या क्षेत्रात कँमेरे लावण्यात आले आहेत. सास्ती व परिसरातील नागरीक व शेतक-यांनी सावधानता बाळगण्याच्या सूचना राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी केल्या आहेत.
          
दिनांक ९ मार्चला सायंकाळी पाच वाजता सास्ती येथील अरुणा नरड व शिला नरड या दोघींना अवघ्या विस मिटर अंतरावर वाघाचे दर्शन झाले. यावेळी एक ट्रँक्टर आल्याने वाघ निघून गेला, त्यामुळे  कसलाही दुर्दैवी प्रकार घडला नाही. परंतू आज गाईला मारल्याची घटना समोर आली. दोन दिवसापासुन सास्ती येथील आनंद खनके यांची गाय घरी आली नव्हती. 

तिचा शोध घेतांना आज सकाळी वेकोलिच्या बंकरजवळ ही गाय मृतावस्थेत आढळली. सदर वार्ताहराने घटनास्थळाला भेट दिली तेव्हा वाघाने गाईला मारुन तिला दहा मीटर फरफटत नेल्याच्या खुणा दिसल्या तसेच तेथे रक्तही पडून होते. मृत गाईचा पंचनामा करण्यात आला अाहे. यावेळी राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट व वनरक्षक हे यावेळी उपस्थित होते.
          
दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी गलगट यांनी वेकोलिचे उपक्षेत्रिय प्रबंधक कोडीयार यांचेशी संपर्क साधून सास्ती खाण कार्यालय व बंकर भागातील रस्त्याने वेकोलि कर्मचारी आणि शेतकरी येणे-जाणे करीत असल्याने या भागातील रस्ता झाडे- झुडपे तोडून मोकळा करावा, अशी विनंती केली आहे. सास्तीचे सरपंच रमेश पेटकर यांनी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करीत गावातील शेतक-यांनी शेतात जातांना काळजी घ्यावी व गुरे-ढोरे शेतात ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
          
गेल्या चार महिण्यापासुन राजुरा तालुक्यातील राजुरा व विरुर स्टेशन या दोन्ही वनपरिक्षेत्रात वाघांचा संचार असल्याचे आढळून आले आहे. १८ जानेवारी २०१९ ला खांबाडा जंगलात वर्षा तोडासे या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर साखरवाही येथे बैलांवर वाघाने हल्ला केला होता. 

या घटने नंतर राजूरा वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट व विरुर स्टेशन वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल हजारे यांनी तातडीने गंभीर दखल घेऊन मोठ्या प्रमाणात गस्त सुरु केली आणि कँमेरे लावण्यात आले. उन्हाळा सुरु झाल्याने पाणी व भक्षाच्या शोधात वन्य प्राणी नागरी भागात येत असल्याने या भागात दहशत निर्मान झाली आहे.