९ वर्षांपूर्वी लावलेली चंदनाची रोपटी आता मिळवून देतील ३० कोटी रुपये !!! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

९ वर्षांपूर्वी लावलेली चंदनाची रोपटी आता मिळवून देतील ३० कोटी रुपये !!!

Share This
खबरकट्टा / शेती व्यवसाय ;
 एक वृक्ष माणसाला काय काय देऊन जातो. आणि आपण मात्र निसर्गाला हानी पोहचवतो. अलकेश भाईकडून हे उदाहरण घेण्यासारखे आहे. चंदनाच्या प्रतीक्षेत त्यांनी हंगामी शेती करून देखील आपले आणि कुटुंबाचे पंपालन पोषण योग्यरीत्या केले आहे. आता काही वर्षांत हा चंदन त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीरूपी सुगंध देखील पसरवणार आहेच.. मात्र आशा कल्पना आपल्याही राज्यात राबवल्या जाव्यात. म्हणजे बळीराजा सुखी होईल. आणि बळीराजा सुखी तर देश सुखी..!! नाही का..??!!

 चंदनाची शेती ही अतिशय दुर्मिळ प्रकारात मोडते. चंदन म्हंटल्यावर आपल्याला आठवते ते चंदनाचे खांडके, दिवाळीतला चंदन साबण आणि वारकऱ्यांच्या भाळावरचा चंदनी टिळा.. पण चिंतेची बाब म्हणजे ह्या मौल्यवान चंदनाची होणारी तस्करी.. कारणच तसे आहे. चंदनाची मागणी आहे ३०० टक्के आणि उत्पादन आहे अवघे ३० टक्के.. दक्षिण भारतात होणारे चंदनाचे उत्पादन देखील ह्या ३० टक्क्यांमध्ये गृहीत आहे. त्यानंतर गुजरात राज्यामध्ये देखील चंदनाचे उत्पादन सुरू झाले आहे आणि आता तेथील शेतकऱ्यांना घसघशीत नफा देखील करून देणार आहे ही चंदनाची शेती.


तर हा किस्सा सुरू झालाय साधारण २०१० – २०११ पासून. गुजरातेतल्या भरुच जिल्ह्यातील हांसोट तालुक्या मधील कांटासायण गावात राहत असलेल्या अलकेश भाई पटेलनी वन विभागातून पांढऱ्या चंदनाची रोपटी आणली. तेव्हा पासून ह्या चंदनाच्या शेतीला  सुरुवात झाली. ९ वर्षांनंतर आज ही रोपटी मोठ्या वृक्षात बदलली आहेत आणि येणाऱ्या ५ एक वर्षात ही गजांतलक्ष्मी अलकेश भाईंना ३० करोडची कमाई करून देणार आहे.


पण ही शेती सोप्पी नव्हती हो.. वाळवंटी गुजरातची माती चंदनाच्या झाडांसाठी योग्य नाही. त्यात भरपूर प्रमाणात क्षार आढळून येतात. पण गुजरात सरकारने ‘पण’ केला की, चंदनाची लागवड गुजरातेत करायचीच आणि शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवायचे. मग सरकारने नवसारी कृषी विद्यालयातून विद्वान शिक्षक अभ्यासक बोलावून शेतकऱ्यांना क्षारयुक्त जमिनीतही चंदनाची लागवड कशी होऊ शकते ह्याचे शिक्षण दिले. अलकेश भाईंनी ह्या मदतीचा पुरेपूर उपयोग करून घेतला.

खडकाळ आणि क्षारयुक्त जमिनीत आणि तेही अल्पशा पाणीपुरावठ्यात ९ वर्षांपूर्वी चंदनाची लागवड केली. आणि आज त्यांच्या प्रयत्नांना १०० टक्के यश मिळाले आहे. ही चांदनावही झाडे १५ ते २० फूट उंच झाली आहेत. हे एक झाड ३ लाखांपर्यंत उत्पन्न देऊ शकते आणि अलकेश भाईंकडे हजार चंदनवृक्ष आहेत. म्हणजे कमाई होईल करोडोंचा घरात. अर्थात त्यांना त्यांचा तस्करी पासून डोळ्यात तेल घालून बचाव करावा लागणार.
🔵🔵चंदनाची शेती : 

चंदन रोपांची लागवड करताना सुरू, मॅझियम, जांभूळ, डाळिंब, पेरू, करवंद, नीम, मेलिया डुबिया उपयुक्त सहयोगी वनस्पतींची लागवड करावी. सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत. सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते. 

चंदन  रोपांची लागवड ४ मीटर बाय ४ मीटर अंतराने करावी. चंदनाला सहयोगी वृक्षाची गरज असल्याने दोन चंदनाच्या मध्य भागामध्ये एक वृक्ष प्रजाती लावावी. जेणेकरून त्याला कायमस्वरुपी आधार मिळेल. उपयुक्त सहयोगी झाडांचा विचार करता चंदनाच्या बरोबरीने सुरू, मॅझियम, जांभूळ, डाळिंब, पेरू, करवंद, नीम, मेलिया डुबिया इत्यादी वनस्पतींची लागवड करावी. सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत. सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी. चंदनाच्या रोपांची मुळे वृक्षाच्या मुळांशी जोडली गेल्यानंतर तूर काढावीत. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते.  जास्त पावसाच्या प्रदेशात रोपांची लागवड ऑगस्ट महिन्यामध्ये करावी.चंदनाची खोड निर्मिती ७ ते १० वर्षांनंतर होते. व्यावसायिक काढणीचा काळ १५ वर्षांचा असतो.


🔵🔵चंदन लागवड करताना -
खासगी जमिनीमध्ये चंदनाची लागवड करण्यासाठी परवानगी लागत नाही. परंतु प्रजाती तोडण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्याकडे परवानगी घेणे गरजेचे आहे. 
चंदन एक संरक्षित वन प्रजाती आहे. त्याच्या तोडणीस आणि विक्रीस वनरक्ष कायदा १९५६ अंतर्गत पुरवठा परवानगी घेणे आवश्‍यक आहे.
लागवड केल्यानतर जमिनीच्या सातबारा नमुन्यामध्ये नोंद करून घ्यावी. जमल्यास संबंधित वन अधिकाऱ्याचा आपल्या प्रक्षेत्रावर चंदन लागवड असल्याचा दाखला प्राप्त करून घ्यावा.

- डॉ. अजय राणे, ७८७५४८५२२७ (वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)

🔵🔵श्वेत चंदनाचे महत्त्व 

शास्त्रीय नाव - Santalum album 
चंदन तेलाचे व्यावसायिक नाव - East Indian Sandalwood Oil 
नैसर्गिकरीत्या चंदनाचा आढळ हा इंडोनेशियापासून न्यूझीलंडपर्यंत आहे.
वृक्ष सदापर्णी असून नैसर्गिकरीत्या भारतात सर्वत्र आढळतो. कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ व तमीळनाडू राज्यात चंदन मोठ्या प्रमाणात दिसते.
हा वृक्ष ४२ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकतो. परंतु हिवाळ्यात पडणारे दव,धुके यास सहन होत नाही. 
चंदनाच्या खोडापासून ऊर्ध्वपातनद्वारे तेल काढले जाते. तेलाचा उपयोग अगरबत्ती, सौंदर्यवर्धक उत्पादने, सुगंधी द्रव्ये आणि साबणामध्ये होतो. 
चंदन तेलाचा उपयोग अत्तर आणि औषधनिर्मितीमध्ये होतो.

🔵🔵रक्त चंदनाचे महत्त्व 

शास्त्रीय नाव - Pterocarpus Santalinus
याचा नैसर्गिकरीत्या आढळ सुक्या पानझडीत वनांमध्ये असतो. ही प्रजाती समुद्रसपाटीपासून १५० - ९०० मी. उंचीवर आढळते.
लाल, काळी आणि निचरा होणाऱ्या जमिनीत रक्त चंदनाची चांगली वाढ होते.  याच्या वाढीसाठी ८८० ते १०५० मि. मी. पाऊस व उष्ण - कोरडे हवामान लागते. 
आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकात रक्त चंदनाची लागवड दिसून येते. 
लाकडाचा उपयोग फर्निचर,वाद्यनिर्मिती तसेच औषधनिर्मितीमध्ये होतो. 
याची लागवड मराठवाडा, विदर्भात करता येते. कोकणामधील अती पावसाच्या भागात रक्तचंदनाची शेती करता येणार नाही; तयार लाकडाच्या विक्रीसाठी सुलभ कायदेशीर बाजार नसल्याने त्याची लागवड करण्यास अजूनही प्रोत्साहन मिळत नाही.
रक्तचंदनाच्या तुलनेत श्वेत चंदनाची लागवड केल्यास त्याचा उपयोग तेलनिर्मिती, हस्तकलेसाठी होतो.

🔵🔵अर्ज सादर करता लागणारी कागदपत्रे 

वृक्ष तोडीचा नमुना नं.१
लागवड असलेल्या जमिनीचा सात बारा
लागवड असलेल्या जमिनीचा ८ अ
लागवड असलेल्या जमिनीचा नकाशा
लागवड असलेल्या जमिनीचा चतुःसीमा
१२ हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्याचे प्रमाणपत्र
उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
पुनः वृक्ष लागवड करणार असल्याचे हमी पत्र (१०० रुपयांचा बॉड पेपर)