मतदार नोंदणीसाठी राज्यभरात आज अन् उद्या विशेष मोहीम : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मतदार नोंदणीसाठी राज्यभरात आज अन् उद्या विशेष मोहीम : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती

Share This
 खबरकट्टा /मुंबई:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीसाठी २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यापूर्वीच्या अभियानात मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


निवडणूक आयोगाने अलीकडेच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही, अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने ही दोन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी आज (शनिवार) आणि रविवार या दोन दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नाव नोंदणीचे अर्ज स्वीकारतील. त्यासाठी बीएलओंकडे नमुना क्र. ६, ७, ८ व ८अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादीही बीएलओंकडे उपलब्ध असेल.

निरक्षर मतदारांसाठी मतदार केंद्रांवर तसेच गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील नागरी कल्याण संघटना आणि सर्व ग्रामसभांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्याबाबत कळविले आहे. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनाही ही माहिती देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय साहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाºयांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.

मतदारांच्या सोयीसाठी www.eci.gov.in या संकेतस्थळावर आॅनलाइन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदारांसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला असून, नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही मुख्य निवडणूक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.