तीळ गुळाचे गुणकारी उपयोग आपल्याला माहित आहेत काय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तीळ गुळाचे गुणकारी उपयोग आपल्याला माहित आहेत काय

Share This

गुणकारी तीळ
संक्रांत ज्या ऋतूत येते, तो ऋतू म्हणजे शिशिर ऋतू! थंड बोचरा वारा या ऋतूत जाणवत असल्याने थंडी कमी करण्यासाठी उष्ण पदार्थ योग्यत्या प्रमाणात वापरावेत. या कालखंडामध्ये शरीराचे बल उत्तम असते. अशा परिस्थितीत तिळगूळ, साजूक तूप गुळाची पोळी हे पदार्थ पथ्यकरच ठरतात.
 • आपण स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी पांढरे तीळ आणतो. औषधामध्ये मात्र काळे तीळ वापरावेत.
 • रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात.
 • सांधेदुखीसाठी तिळाचेतेल गरम करावे आणि या गरम तेलाने कंबर, सांधे सर्वांना अभ्यंग (मालिश) करून शेकावे. त्यामुळे दुखणे कमी होण्यास मदत होते.
 • म्हणूनच तर बाळंतिणीला तिळाचे तेल अंगाला लावण्याची पद्धत आहे. तिळ मातेचे दूध वाढवतात म्हणून बाळंतिणीला तिळाचा लाडू, भाजलेले तीळ देण्याची प्रथा आहे.
 • बाळंतशेपा, ओवा, भाजलेले तीळ, सैंधव, बडीशेप एकत्र करून बाळंतिणीला दिल्यास वाताच्या तक्रारी, गॅसेस होणे, पचन न होणे या सर्वांस आराम मिळतो.
 • मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असल्यास लोणी-खडीसाखर, नागकेशर यांच्यासमवेत तीळ सेवन केल्यास चांगला परिणाम होतो.
 • लहान मुलांना काहीवेळा अपचन होऊन पोट दुखते. अशा वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार तिळतेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे. दुखणे लवकर कमी होते.

गुळाचा उपयोग 


तिळाप्रमाणेच गुळही गुणकारी आहे. गूळ अतिशय आरोग्यदायी असल्याने स्वयंपाकात तर तो वापरला गेलाच पाहिजे. भरपूर श्रम केल्यानंतर खूप थकवा येतो.
 • अशा वेळी गुळाचा खडा पाण्यात घालून विरघळवून पाणी प्यावे.
 • तसेच नवीन गूळ हा पचण्यास जड आणि कफ-पित्त वाढविणारा असतो.
 • शिवाय कफ, सर्दी झाल्यास अशा वेळी सुंठ, गूळ आणि तूप यांचे चाटण किंवा गोळी रोज खाल्ल्यास चांगला फायदा होतो.
 • तसेच साजूक तुपाबरोबर गूळ सेवन केला, तर उष्ण पडत नाही. म्हणूनच तर संक्रातीला गुळाची पोळी तुपाबरोबर खाण्याची पद्धत आहे.

आपले सण, आहार आणि आरोग्य याचा किती जवळचा संबंध आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. यापार्श्‍वभूमीवर तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण पाहिले. आजारासाठी विशिष्ट तपासण्या, नियमित औषधे, तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला हे तर महत्त्वाचे आहेच. पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्‍यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल, असा मला विश्‍वास आहे.